विधानपरिषद, पालघर निवडणुकांसाठी कल्याण-डोंबिवलीत हातमिळवणी

थोडे नमते घेत राष्ट्रवादीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी केली असली तरी भविष्यातील राजकारणाचा वेध घेऊनच राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर जमवून घेतले आहे. योग्य नियोजन करूनच राष्ट्रवादीकडून फासे टाकले जातात आणि काँग्रेस त्यामागे फरफटत जाते हा नेहमीचाच अनुभव या वेळीही आला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपशी हातमिळवणी करीत राष्ट्रवादीने तत्कालीन सभापती काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर केला होता. राष्ट्रवादीने टोकाची भूमिका घेऊ नये, अशी तेव्हा विनंती काँग्रेसने केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करीत राष्ट्रवादीने भाजपच्या मदतीने काँग्रेसला धक्का दिला होता. तत्पूर्वी, काँग्रेसचा दावा असताना राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांच्यासाठी विधान परिषदेची जागा घेतली होती. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून राष्ट्रवादीने भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करीत आले आहेत. काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या नावे खडे फोडतात, पण राष्ट्रवादीने जरा मदतीचा हात पुढे केल्यावर वाहत जातात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने तसेच झाले आहे. राष्ट्रवादी स्वत:चा फायदा असतो तेव्हाच आघाडी करते, एरव्ही काँग्रेसला विचारतही नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केली.

कल्याण-डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी असल्याने आघाडी केली, असे बोलले जात असले तरी अलीकडेच झालेल्या नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरारमध्ये राष्ट्रवादीने आघाडीच्या संदर्भात फार काही गांभीर्याने घेतले नव्हते. पुढील वर्षभरात विधान परिषदेच्या २८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये विजयासाठी राष्ट्रवादीला मतांचे गणित जुळविण्याकरिता काँग्रेसच्या मदतीची काही ठिकाणी गरज आहे. गेल्याच आठवडय़ात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या निवडक नेत्यांची बैठक झाली. तेव्हा विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेण्यात आला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आघाडी करतानाही राष्ट्रवादीने चार प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह धरला. काँग्रेसला संधी असलेल्या प्रभागांमध्येच मैत्रीपूर्ण लढती होत असल्याकडे लक्ष वेधण्यात येते. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात गुरुवारी दोन्ही प्रदेशाध्यक्षांची बैठक होत आहे.

दोन्ही काँग्रेसमध्ये ‘देणेघेणे’..

जुलै महिन्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांचीही विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित लढल्यास विधानसभा आमदारांमधून तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. रामराजे आणि मुंडे यांना निवडून आणण्याकरिता राष्ट्रवादीला काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता लागणार आहे. याशिवाय नगर, सोलापूर, यवतमाळ, सांगली-सातारा आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची मते राष्ट्रवादीकरिता उपयुक्त आहेत. हे सारे लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने कल्याण-डोंबिवलीमध्ये आघाडी करून वातावरण अनुकूल केले आहे. आघाडीत पालघर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने मदत करावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे.