‘सरकारने एफडीआय व इतर निर्णय घेतले ते योग्य आहेत. त्यामुळे निश्चितच काही प्रमाणावर विश्वास परत आला आहे. या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाला आहे पण एवढे पुरेसे नाही, असे टाटा समूहाचे मावळते अध्यक्ष रतन टाटा यांनी मुलाखतीमध्ये म्हटले. सध्याच्या स्थितीवर टीका करताना टाटा यांनी आपल्या देशाच्या एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येण्याबाबत आशावाद व्यक्त केला.
‘देशात कायद्याचे राज्य आहे हे दाखवून देऊन लोकांना आश्वस्त करावे लागेल. जे कायदे अस्तित्वात आहेत ते राहतील, जर त्यात काही बदल करायचे असेल, तर त्यासाठी काही प्रक्रिया आहे. कायद्यातील बदल भविष्यकालीन असावा की पूर्वानुलक्षी यावर फार गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,’ असे त्यांनी सांगितले.
बहुउत्पादनी किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकी गुंतवणूक मान्य करण्याचा निर्णय हा महत्त्वाचा आहे, असे सांगून ते म्हणाले, की यात ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य राहील व कमी किमतीत वस्तू मिळतील. जर तसे झाले नाही तर ते प्रारूप अपयशी ठरले असे म्हणायला हरकत नाही.     
मनमोहन सिंग यांचे कौतुक
पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मुक्तकंठाने प्रशंसा करताना टाटा म्हणाले, की ते १९९० च्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आहेत, एकात्म वृत्तीने काम करणारा हा नेता निश्चितच वेगळा आहे.
‘माझ्या मते त्यांनी गप्प बसून चालणार नाही, सर्व बाजूंनी त्यांच्यावर टीका होते. त्यानंतर तुम्ही काही करीत नाही. जर तुम्हाला त्यांनी काही करावे असे वाटत असेल आणि तुम्ही त्यांच्यावर चौफेर टीकाच करीत असाल, तर अशीच शक्यता अधिक असते, ज्यात ते काहीच करणार नाहीत,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
संकुचित भांडवलवादावर टिप्पणी करताना ते म्हणाले, की हा भारतातच नव्हे तर जगामध्ये मोठा प्रश्न होत चालला आहे. भारत त्यात आघाडीवर नाही पण आपल्याकडेही लक्षणीय पातळीवर हे प्रकार चालतात असे मला वाटते. संकुचिक भांडवलवादामुळे श्रीमंत हे आणखी श्रीमंत होत जातात व गरीब हे आणखी गरीब होत जातात. ही असमानता घातक असते. त्यात सत्ता काहींच्या हाती केंद्रित होते व विषम स्पर्धा निर्माण होते. कायद्याचा जो उद्देश आहे त्यानुसार अंमलबजावणी तंतोतंत झाली, तर संकुचित भांडवलवादाला आळा बसू शकतो, सध्या आपण जे कायदे करीत आहोत त्यात काही चुकीचे नाही. पण दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांची अंमलबजावणी फारच वाईट होते. कायदा पाळला गेला नाही की त्यात त्रुटी दिसू लागतात व नवीन कायदा केला जातो. त्यामुळे सर्वानाच त्याचा फटका बसतो. जणू काही सगळेच कायद्यांचे उल्लंघन करणारे आहेत. नवीन कायदा केला तरी कायद्याचे उल्लंघन करणारे करीतच राहतात कारण त्याची अंमलबजावणी अपुरी असते. परिणामी ज्या कायद्यात उल्लंघन करणे कठीण असते, त्याच्या जागी नवा पक्षपाती कायदा येतो, चांगला कायदा बाजूला राहतो. जिथे अपवाद चालत नाहीत असा ठोस कायदा असेल, तर तुम्ही कोण आहात, तुमच्या कोणाशी ओळखी आहेत याला फार वाव राहत नाही; परिणामी संकुचित भांडवलवाद कमी होतो.ही समस्या आणखी बिकट होत चालली आहे याबाबत विचारले, तर ते म्हणाले, की ती एक निरीक्षण म्हणून पुढे आलेली बाब आहे तसे आकडेवारीनिशी सिद्ध करण्यासारखे पुरावे नाहीत.
तीस-चाळीस वर्षांपूर्वी कुणी चित्रपटगृहातील तिकिटांसाठीची रांग ओलांडून मधूनच पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तर आरडाओरडा होत असे पण आज कुणी तरी येतो, पुढे घुसतो व त्याला पाहिजे ते घेतो, दहा तिकिटे घेतो मग तो काळाबाजारवाला असू शकतो, त्याला वाटेल ते तो करतो. त्याला कुणी थांबवत नाही. जर थोडे पैसे देऊन रांगेत पुढे घुसता येत असेल, तर शक्य असेल तर मीही तसे करीन, अशी प्रवृत्ती वाढू लागते, स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांत हे घडले आहे.
भारतीय उद्योगाची सद्यस्थिती
उद्योगातही असेच घडत आहे काय, असे विचारले असता ते म्हणाले, की जर एखाद्या उत्पादनाचा पुरवठा कमी असेल, तर काही कंपन्या त्याचा फायदा घेतात व पैसे उकळतात. काही वितरक, मध्यस्थ पैसे कमावतात. जरी ही स्थिती असली, तरी त्याची सक्ती केलेली नाही. कमाल किरकोळ किंमत वस्तूवर लिहिलेली असते, त्याचे उल्लंघन झाले तर खटला भरू, असे तुम्ही सांगू शकता. टाटा समूह नियम वाकवून, तडजोडी करून उद्योग चालवीत नाही याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, प्रामाणिकपणे उद्योग करता येतो, तरीही वाढ, विकास साधता येतो. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. तुम्हाला त्यातूनच  सुख मिळते व तुम्ही घरी गेल्यावर शांत झोपू शकता. तुम्ही एखादी गोष्ट गमावता. तुम्हाला हव्या असलेल्या एअरलाइन उद्योगात जाता येत नाही, काही शक्ती तुमच्याविरोधात काम करतात, काळजात काही काही जखमा होतात, पण मला वाटते आम्ही तरीही ज्या उद्योगांमध्ये आहोत तेथे चांगली कामगिरी केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशावादी आहात काय, असे विचारले असता ते म्हणाले की, मला विश्वास आहे, भारताच्या क्षमतेबाबत व भवितव्याबाबत कुठलीच शंका नाही. मला वाटते आपला देश महान आहे, त्याच्यात मोठी क्षमता आहे. आजूबाजूची स्थिती तशी नसतानाही काही गोष्टी आपण आपल्यावर लादून घेतल्या आहेत. आपल्या भोवतीची स्थिती ही गुंतागुंतीची आहे व व्यापकही आहे. त्यामुळेच आपण भविष्यकाळात आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येऊ, कुणी भारताला बाजूला सारून काही करू शकणार नाही, मला तरी तसे वाटते.