वारंवार शासनाकडून स्पष्ट करूनही निवासी पुरवा म्हणून शिधापत्रिकेची मागणी होत असल्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयाने निवासाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकेची मागणी करू नये अशा स्पष्ट सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने जारी केल्या आहेत.
विविध शासकीय कार्यालये व प्राधिकरणांकडून अर्जदारांना निवासाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकेची मागणी केली जाते. शिधापत्रिका सादर न केल्यास संबंधित अर्जदाराला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्यक्षात अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका देताना संबंधित व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर राहते अथवा नाही एवढीच जुजबी चौकशी केली जाते. याचा ते निवासस्थान त्याचे आहे अथवा नाही याच्याशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाने कोणत्याही शासकीय व निमशासकीय विभागाने निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिकेची मागणी करू नये असे २०१० सालचे परिपत्रक पुन्हा एकदा जारी केले आहे.