मुंबईतील सँडर्हस्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना लोकलच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने संतप्त स्थानिकांनी रेल्वेवर दगडफेक करून रेलरोको केला होता. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास दोन तास विस्कळीत झाली होती. संतप्त स्थानिकांनी लोकलवर दगडफेक सुरू केल्याने खबरदारी म्हणून लोकलगाड्या सीएसटी स्थानकातच थांबविण्यात आल्या होत्या.
मंगळवारी सकाळी ११ वाजता गौरव वोरा(१३) हा मुलगा सँडर्हस्ट रोड ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळ ओलांडत असताना लोकल खाली आला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता व त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. यानंतर संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी सँडर्हस्ट रोड स्थानकावर जाऊन लोकलवर दगडफेक करून आंदोलनास सुरूवात केली. स्थानिकांच्या आंदोलनामुळे हार्बर रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पण रेलरोकोमुळे दोन तास खोळंबा झाला आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.