ऐन रेल्वे प्रवासी-ग्राहक सुविधा पंधरवडय़ात आसनगावहून ठाण्याला येणाऱ्या एका गाडीच्या पेण्टोग्राफमध्ये आग लागून डब्यात धूर पसरल्याने बुधवारी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली होती. ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागल्याचे समजत असले, तरी रात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नव्हते. मात्र आता या आगीची दखल थेट ‘दिल्ली’ने घेतली असून आता रिसर्च, डिझाइन अ‍ॅण्ड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) या संस्थेचे सदस्य या आगीबाबत तपास करण्यासाठी येणार आहेत.
हे सदस्य शुक्रवारी या प्रकरणी चौकशी करून आपला अहवाल देणार आहेत. गाडीच्या पेण्टोग्राफला आंबिवली स्थानकात आग लागली, पण शहाड-कल्याणदरम्यान डब्यात धूर येऊ लागल्याने प्रवासी घाबरले होते. गाडी थांबताच उडय़ा मारून लोकमार्गातून पायपीट करण्याचा पर्याय अनेकांनी स्वीकारला.
थेट विद्युतप्रवाहाची मोटर असलेली (डीसी) गाडी एसी विद्युतप्रवाह असलेल्या भागातून चालणे शक्य व्हावे, यासाठी गाडीच्या मोटरमध्ये असलेल्या एका भागात बिघाड झाल्याने धूर आल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले. आग लागलेली गाडी जुनी होती. हे आगीचे कारण आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.
*गाडीच्या डब्याच्या पेण्टोग्राफमध्ये आंबिवली स्थानकातच आग.
*शहाड-कल्याणदरम्यान डब्यातून धूर. प्रवाशांत घबराट
*ही गाडी कल्याण स्थानकात आणल्यावर आग विझविली.