मतदार यादीत नावे नसल्याने लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठय़ा प्रमाणावर ओरड झाली होती. मतदानाचा हक्क डावलला म्हणून आंदोलन झाले. २६ लाख मतदारांना फेर नोंदणीसाठी पत्रे पाठविण्यात आली. २० लाख पत्तेच सापडले नाहीत. नावे वगळले गेल्यापैकी फक्त लाखभर मतदारांनी फेरनोंदणी केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीकरिता राज्यात आठ कोटी, २८ लाख मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर नव्याने सुमारे २३ लाख मतदारांची नोंदणी झाली. अजूनही १७ तारखेपर्यंत नावे नोंदविता येऊ शकतील, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी दिली. १ ऑगस्टपासून नव्याने सुमारे अडीच लाख अर्ज दाखल झाले आहेत.
तेरा मतदारसंघांची निवड
आपण केलेले मतदान योग्य पद्धतीने नोंदले गेले की नाही हे समजण्याची ‘व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल’ यंत्रणा राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे. औरंगाबाद शहर (तीन मतदारसंघ), अमरावती शहर (दोन मतदारसंघ), नाशिक शहर (तीन मतदारसंघ), नगर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या मतदारसंघांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.