चकली, लाडूच्या किमतीत मोठी वाढ; चिवडय़ातूनही डाळ हद्दपार

24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

चणाडाळीच्या किमती दुपटीने वाढल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर फराळ बनवणे खिशाला जड होऊ लागले आहे. डाळीच्या वाढत्या किमतीचा फटका तयार फराळालाही बसला असून बाजारात पाकीट रूपात उपलब्ध असलेला हा फराळ महाग झाला आहे. चणाडाळीच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने ७० रुपये प्रतिकिलोने चणाडाळ दिवाळीपूर्वी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र दिवाळी तीन दिवसांवर आली असतानाही दुकानांमध्ये चणाडाळ १५० रुपये किलोला विकली जात आहे.

डाळींच्या वाढलेल्या किमतींचा फटका तयार फराळ विकत घेणाऱ्या ग्राहकांनाही बसला आहे. तयार बेसन लाडू, तिखट शेव, कडबोळी या पदार्थाच्या किमतीत २० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. चकली भाजणीचे पीठ २४० ते २६० रुपये किलोने विकले जात आहे. तर एक नग लाडूची किंमत १५ रुपयांवरून २२ ते २५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तिखट शेवेची किंमत २६० ते २८० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. डाळीच्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील चिवडय़ातील डाळीही गायब झाल्या आहेत. चिवडा, करंजी, शंकरपाळे या पदार्थाच्या किमतीत वाढ झाली नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळींच्या किमतीत वाढ झाल्याने काही प्रमाणात फराळाच्या किमतीवर परिणाम झाला आहे, असे बेडेकर दुकानाचे मालक अमित बेडेकर यांनी सांगितले. केंद्राच्या मदतीनंतर राज्यातील डाळीच्या किमती कमी होतील अशी अपेक्षा आहे. मात्र त्याचा परिणाम तयार फराळांच्या किमतींवर होण्याची शक्यता कमी आहे. फारसा फरक जाणवणार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दिवाळीत तेलकट आणि तूपकट पदार्थ खाण्यापेक्षा बेक्ड पदार्थाना यंदाही ग्राहकांनी पसंती दर्शविली आहे. बेक्ड करंजी, बेक्ड चिवडा या पदार्थाना मागणी असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांत बेक्ड पदार्थाचा ट्रेंड तयार झाला असल्याचे ‘दुग्धसागर’ दुकानाचे मालक सुहास जोशी यांनी सांगितले.

तयार फराळाला मागणी

नोकरदार महिलांना वेळ नसतो त्यामुळे तयार फराळांची मागणी वाढली आहे. चकली भाजणीचे पीठ घेऊन तयार करण्यापेक्षा तयार चकली घेण्याकडे लोकांचा कल अधिक असल्याचे बेडेकर दुकानाचे अमित बेडेकर यांनी सांगितले.

फराळांची परदेशवारी

मुंबईतून मोठय़ा प्रमाणात अमेरिका, दुबई, कॅनडा या देशांमध्ये फराळ पाठविला जातो. विशेष पॅकमध्ये पाठविल्या जाणाऱ्या फराळात दिनदर्शिका, मसाला दूध, फराळाचे पदार्थ, पणत्या, उटणे, बाकरवडी अशा अनेक पदार्थाचा समावेश असतो. पाव किलोचा इकोनॉमी आणि अर्धा किलोचा फॅमिली हॅम्पर पॅक असतो. यामध्ये अमेरिका आणि कॅनडाची फराळवारी महागडी असून अमेरिकेला फराळ पाठविण्यासाठी इकोनॉमी पॅकला ५ हजार, तर फॅमिली पॅकसाठी ६८०० रुपये खर्च करावे लागतात. तर कॅनडासाठी इकोनॉमी पॅकचे ५ हजार, तर फॅमिली पॅकचे ७ हजार रुपये मोजावे लागतात. इकोनॉमी पॅकचा फराळ दुबईला पाठवायचा असल्यास ४ हजार, लंडनला ४ हजार पाचशे रुपयात पोहोचविला जातो. फॅमिली पॅकसाठी ही किंमत वाढून अनुक्रमे ५ हजार, ६ हजार पाचशे पर्यंत आहे. अनेक दुकानांमध्ये ३, ४, ५ किलोचा हॅम्पर पॅकही ठेवण्यात आला आहे. या हॅम्परबरोबर घरगुती फराळ पाठविला जाण्याचे प्रमाणही वाढत आहे.