मुंबई-ठाण्याच्या तुलनेत किफायतशीर दरात घरे उपलब्ध असल्याने दिवसेंदिवस अंबरनाथ शहराची लोकसंख्या वाढत असली तरी नागरी सुविधा पुरविण्यात स्थानिक प्रशासन अयशस्वी ठरले आहे. या अनास्थेला गेली दोन दशके पालिकेत सत्ताधारी असलेली शिवसेना-भाजप युतीच प्रामुख्याने जबाबदार आहे. त्यामुळे रखडलेला विकास हाच यंदाच्या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे एकूण ५७ जागा असलेल्या या पालिकेत शिवसेना विरुद्ध बंडखोर आणि विखुरलेले विरोधक असेच चित्र आहे.
पालिकेत भाजपचा अवघा एक नगरसेवक असला तरी मोदी लाटेमुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला भरभरून मते मिळाली. शहरातील सेनेचे नगरसेवक असलेल्या १६ प्रभागांमध्ये भाजपला आघाडी मिळाली. त्यामुळे भाजपने यंदा स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी निवडून येण्याची क्षमता या निकषावर अनेक आयारामांना तिकिटे दिली आहेत. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच भाजपलाही काही प्रमाणात बंडखोरांची समस्या भेडसावणार आहे. कल्याण जिल्हाप्रमुख आणि आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली सेनेवर थेट टीका करणे टाळून भाजपने घोटाळेमुक्त शहरविकासाची हमी अंबरनाथवासीयांना दिली आहे.     
अंबरनाथमधील काही भागांत रिपाइंला मानणारा मोठा वर्ग आहे. गंमत म्हणजे रिपाइं (आठवले गट) अधिकृतपणे भाजपसोबत असला तरी स्थानिक रिपाइंने (सेक्युलर) मात्र यंदा राष्ट्रवादीच्या घडय़ाळासोबत जाणे पसंत केले आहे. काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे.
राज ठाकरे यांच्या करिश्म्यामुळे गेल्या निवडणुकीत मनसेचे शहरात सहा नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत बहुमत नसलेल्या शिवसेनेची सत्ता स्थापन होण्यात मनसेचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणे पसंत केले. गेली दोन वर्षे नगराध्यक्ष सेनेचा आणि विषय समित्यांची सभापतीपदे मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे अशी पालिकेत सर्वपक्षीय सत्ता होती. विकासकामांच्या भांडवलावर मनसेचे उमेदवार मतांचा जोगवा मागत असले तरी मनसेलाही बंडखोरीची लागण झालेली आहे.
 नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कामांची  उदाहरणे देत सेनेने पत सावरण्याचा प्रयत्न केला.

शहराच्या प्रमुख समस्या
* वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील नागरी सुविधांवर ताण
* शहरात अपुरा पाणीपुरवठा
* जीर्ण झालेल्या वाहिन्यांमुळे पाणीगळतीचे प्रमाण ३० टक्क्य़ांच्या पुढे आहे.
* राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा औद्योगिक विभाग म्हणून अंबरनाथची ओळख. त्यामुळे पूर्व विभागातील वडवलीतून औद्योगिक विभागात जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीचा बराच ताण आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग प्रकल्पाची आवश्यकता
प्रशांत मोरे, अंबरनाथ