सरकारच्या धोरणात बदल; पोलिसांना पुन्हा पिवळे दिवे; नियम मोडल्यास गुन्हा

मुंबई तसेच राज्यातील महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरकारी अधिकारी यांना आपल्या सरकारी गाडय़ांवर मनासारखे दिवे लावून रुबाबात मिरविण्यास अखेर बुधवारी परिवहन विभागाने हिरवा कंदील दाखवला. त्याचप्रमाणे मुंबईच्या महापौरांना स्थिर लाल दिवा (फ्लॅशरविना लाल) तर पोलीस विभागातील वाहनांना फिरता अंबर दिवा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय दिवा वापरण्यासाठी काही नवीन पदांचा समावेश करण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वाहनांवरील दिव्यांच्या वापरावर र्निबध आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यात पोलिसांच्या वाहनांवर निळा दिवा लावण्याचा निर्णय झाला होता. तसेच फिरता लाल दिवा, स्थिर लाल दिवा, स्थिर अंबर दिवा, निळा दिवा यांच्या वापरावरही र्निबध आणण्यात आले होते. मात्र आता या धोरणात शिथिलता आणण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. आतापर्यंत परिवहन, राज्य उत्पादन शुल्क आणि वने या विभागांची वाहने, एस्कॉर्ट तथा पायलट कार म्हणून वापरली जाणारी वाहने आणि पोलीस विभागातील वाहने यांना स्थिर निळा दिवा किंवा लाल- निळा- पांढरा असा दिवा लावला जात होता. आता या वाहनांना फिरता अंबर दिवा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

परदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मुंबई शहरास भेट देतात, त्या वेळी महापौरांना राजशिष्टाचाराप्रमाणे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यानंतरचा दर्जा असतो. त्यामुळे महापौरांना त्यांना स्थिर लाल दिवा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच शासनाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हा परिषद अध्यक्ष, अ आणि ब वर्ग महापालिकांचे महापौर, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त यांना स्थिर (फ्लॅशरविना) अंबर दिवा देण्यात आला होता. आता त्याऐवजी या पदांना फिरता अंबर दिवा देण्यात आला आहे.

तसेच या प्रवर्गामध्ये आता प्रधान सचिव किंवा सचिव पदावर नियुक्त होण्यास पात्र समकक्ष अधिकारी, मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना समकक्ष असलेले न्यायाधिकरणातील अध्यक्ष व सदस्य तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी या नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे बंब, बचाव कार्यासाठी वापरली जाणारी मोठी शिडी असणारी वाहने यांना फिरता लाल दिवा, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार यांना स्थिर निळ्या दिव्याऐवजी स्थिर अंबर दिवा देण्यात आला आहे.

  • परिवहन आयुक्त हे दिवा विहित केलेल्या वाहनांना दिवा सुविधेच्या संदर्भात आरएफआयडीयुक्त स्टिकर देणार आहेत. हे स्टिकर वाहनाच्या पुढील बाजूच्या काचेवर (विड स्क्रीनवर) चिकटविणे बंधनकारक असेल, अशी माहितीही रावते यांनी दिली.
  • या नियमावलीचा भंग केल्याचे आढळून आल्यास संबंधित वाहन तात्काळ जप्त करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.