झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला (झोपु) मान्यता मिळूनही राजकीय नेते आणि अंडरवर्ल्डच्या विरोधामुळे गेल्या १५ वर्षांपासून चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीचा विकास पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांमध्ये मोठय़ा प्रमाणात संताप असून शासनानेच येथे प्रकल्प राबवून आम्हाला हक्काचे घर मिळवून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला मानला जाणारा चेंबूरचा सिद्धार्थ कॉलनी हा परिसर पूर्णपणे झोपडपट्टी असून यामध्ये साडेतीन हजारांहून अधिक झोपडीधारक आहेत. २००२ मध्ये एका विकासकाने या ठिकाणी झोपु प्रकल्प राबवण्यासाठी सर्व रहिवाशांना एकत्र आणले. इमारतीमध्ये घर मिळणार असल्याने रहिवाशांनीही तात्काळ घरांची आवश्यक ती कागदपत्रे जमा केली. त्याच वेळी विकासकाने यापुढे सर्व झोपडीधारकांचे वीज आणि पाणी बिल स्वत: भरणार असल्याचे रहिवाशांना सांगितले. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत एकाही झोपडीधारकाने वीज आणि पाणी बिल भरलेले नाही. त्यानंतर विकासकाने हा प्रकल्प कार्तिक भट्ट या विकासकाला विकला. मात्र वीज आणि पाणी बिल कोण भरणार यावर काहीही चर्चा झाली नाही. कुणीही जबाबदारी न घेतल्याने रहिवाशांच्या नावावर ४ ते ५ लाखांची वीज बिल थकबाकी जमली. नंतर नंतर तर वीज कंपनीने रहिवाशांची वीज खंडित करण्यास सुरुवात केली.

सध्या या परिसरात विजेसह रस्ते, गटार आणि पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. दिवसभर पाऊस पडल्यास अनेक घरांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी शिरते, तर येथील रस्त्यांची देखील दुरवस्था झाली आहे. जलवाहिन्या खराब झाल्याने अनेकदा नळाला पाणी दूषित असते. त्यामुळे येथील रहिवाशांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय अनेक रहिवाशांची घरे मोडकळीस आली आहेत. मात्र झोपु प्रकल्पामध्ये कधीही घरे तोडण्यात येथील या भीतीने अनेक वर्षांपासून रहिवाशांनी घरांची डागडुजीदेखील केलेली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे जीव मुठीत धरून या ठिकाणी राहात आहेत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या ठिकाणी लोक राहात आहेत. त्यामुळे दोन्ही विकासकांनी एकत्र येऊन हा प्रकल्प लवकर पूर्ण करावा आणि आम्हा गरिबांना स्वत:चे हक्काचे घर द्यावे.

श्रीकांत उबाळे, स्थानिक रहिवाशी

राजकीय नेते आणि अंडरवर्ल्डकडून नेहमीच पैशांची मागणी होत आहे. पैसे न दिल्याने त्यांच्याकडून अनेक अडथळे निर्माण होत आहेत. मात्र यापुढे कोणालाही न जुमानता लवकरच काम सुरू करणार आहे. शिवाय रहिवाशांचे वीज बिल देखील भरणार आहे, मात्र रहिवाशांनी मला पाठिंबा द्यावा.

कार्तिक भट्ट, विकासक