राज्यभरात ठिकठिकाणी आलेल्या आकस्मिक पावसामुळे शनिवारी विजेची मागणी थेट १७०० मेगावॉटने खाली आली. वीजमागणीत अचानक मोठी घट झाल्याने ग्रिड सुरक्षेसाठी वीजनिर्मिती कमी करण्याचे आदेश वीजप्रकल्पांना द्यावे लागले. पावसामुळे अमरावती परिसरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्या राज्यात विजेची मागणी सरासरी साडेबारा हजार मेगावॉट आहे. शुक्रवारी ती १२६०० मेगावॉट होती. शनिवारी सकाळपासूनच राज्यात ठिकठिकाणी आकाशात ढग दाटून आले. ढगाळ हवामानामुळे हवेत गारवा आला. दुपारपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे विजेची मागणी अकस्मात १७०० मेगावॉटने खाली आली. त्यामुळे राज्यातील आणि केंद्रीय कोटय़ातील ‘एनटीपीसी’च्या वीजप्रकल्पांना वीजनिर्मितीचे प्रमाण कमी करण्यास सांगण्यात आले. पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने अमरावती भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करावा लागल्याचे समजते.