घरांच्या खरेदी-विक्रीची नोंदणी विकासकांच्या कार्यालयात करण्याचा पुण्यातील प्रयोग यशस्वी झाल्यावर त्याची सुरुवात रविवारपासून मुंबईत करण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी शासकीय कार्यालयात होणारी गर्दी, दलालांचा सुळसुळाट हे टाळण्याकरिता मोठय़ा विकासकांच्याच कार्यालयांमध्ये नोंदणीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची सुरुवात पुण्यातील ‘नांदेड सिटी’ या प्रकल्पातून करण्यात आली. महिनाभरात ७५ सदनिकांच्या खरेदीची ई-नोंदणी विकासकाच्या कार्यालयातून झाल्याने हा प्रयोग यशस्वी ठरला. मुंबईत या प्रकल्पाची सुरुवात होत असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली. मुलुंडमधील ‘मॅरेथॉन मॉन्टे विस्टा’ या प्रकल्पाच्या कार्यालयात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.