रेल्वेच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल

मध्य तसेच पश्चिम रेल्वेने १ ऑक्टोबरपासून आपल्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकात विविध बदल केले आहेत.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देशाच्या शेवटच्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘उदय’, ‘अंत्योदय’, ‘हमसफर’, ‘तेजस’ अशा विविध नव्या गाडय़ांचा समावेश यात करण्यात आला आहे. आनंदाची बातमी म्हणजे कोकणातल्या प्रवाशांसाठी ‘तेजस’ श्रेणीतील एक नवीन गाडी सीएसटी ते करमाळी यांदरम्यान सुरू करण्यात आली आहे.

११२०९/११२१० सीएसटी-करमाळी-सीएसटी ही तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. ही गाडी आठवडय़ातून मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी पाच दिवस मुंबईहून मध्यरात्री १२.२० वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी ११.०० वाजता करमाळी येथे पोहोचेल. ही गाडी करमाळीहून त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता निघून त्याच दिवशी रात्री १०.४५ वाजता मुंबईला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ आणि थिवीम या स्थानकांमध्येच थांबेल.

या गाडीबरोबरच अहमदाबाद-चेन्नई, वांद्रे-पाटणा या वातानुकूलित हमसफर एक्स्प्रेस, टाटानगर-एलटीटी अंत्योदय एक्स्प्रेस, पुणे-अमरावती वातानुकूलित गाडी, सोलापूर-मीरज एक्स्प्रेस या गाडय़ांचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय पश्चिम रेल्वेवरील २६ गाडय़ा वेगवान करत त्या गाडय़ांचा क्रमांक व वेळ बदलण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवर नांदेड-पुणे यांदरम्यान धावणारी गाडी आता पनवेलपर्यंत वाढवण्यात आली असून ती आठवडय़ातील सहा दिवस नांदेडहून रात्री ८.३० ऐवजी संध्याकाळी ५.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजता पनवेलला पोहोचणार आहे. ही गाडी पनवेलहून दुपारी चार वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२५ वाजता पोहोचेल. आणखी  एक नियमित गाडी  सुरू केल्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान होणारा नाहक त्रास यापुढे कमी होणार आहे.