सौंदर्योपचार करणाऱ्या ब्युटी पार्लर व्यवसायाकडे करिअर म्हणून स्त्रिया अभावानेच पाहतात. कुटुंबाला पूरक अर्थार्जनाचे माध्यम यापलिकडे या व्यवसायाला महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे पावलोपावली ब्युटी पार्लर दिसत असूनही त्याचे मोठय़ा उद्योगात रुपांतर झालेले अभावाने दिसते. छोटय़ा गावातील ब्युटी पार्लरपासून सुरुवात करून वेलनेस क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका बनलेल्या रेखा चौधरी यांच्याकडून हाच करिअर मंत्र जाणून घ्यायची संधी मिळणार आहे. लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या बुधवारी होणाऱ्या कार्यक्रमात रेखा यांच्याशी थेट संवाद साधत येईल.
नंदुरबारसारख्या ग्रामीण भागात शिक्षण झाल्याने इंग्रजीचा गंध नाही, नवीन सौंदर्योपचारांची तोंडओळखही नाही, अशी सामान्य पाश्र्वभूमी असतानाही रेखा यांनी हे विस्मयकारक यश मिळवले आहे. देशी-विदेशी स्पा उत्पादनांच्या व्यवसायाखेरीज, साहित्यसामग्री, सेवा आणि या क्षेत्रातील प्रशिक्षणाचे कामही रेखा यांनी स्थापन केलेली जेसीकेआरसी ही कंपनी करते. याशिवाय स्पा ट्रीटमेंटचे आंतरराष्ट्रीय पेटंट घेणारी ती पहिली भारतीय स्त्री आहे. वेलनेस क्षेत्रातील करिअर संधी, या क्षेत्रातील आव्हाने, यशाचे मार्ग यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे रेखा यांच्याबरोबर होणाऱ्या ‘केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंज’मधील संवादातून मिळू शकतील. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल.
* कधी – बुधवार, १६ मार्च
* कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई
* वेळ – सायंकाळी ४.४५
* प्रवेश : प्रथम येणाऱ्यास प्राधान्य