मुंबई उपनगरातील आठ लाख वीज ग्राहकांना टाटा पॉवरकडे वळवणाऱ्या राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्णयाला केंद्री विद्युत अपिलीय लवादाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी वीज वापरणारे हे आठ लाख वीज ग्राहक सध्या तरी आर इन्फ्राकडेच राहणार आहेत.
या ग्राहकांना टाटाची स्वस्त दरातील वीज हवी असल्यास त्यांना वहन आकार, अनुदान अधिभार आदी वाढीव शुल्क अदा करावे लागणार आहे.
मुंबईतील ११ भागांमध्ये टाटा पॉवर कंपनीला आपली वीज यंत्रणा उभारण्याचा आदेश देण्यात आला होता. या वीज यंत्रणेमुळे ०-३०० युनिट प्रतिमहिना वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना वीज स्वस्तात मिळणार होती. मात्र, वर्षभरात टाटा पॉवर अशी वीज यंत्रणा निर्माण करण्यात अपयशी ठरली. तरीही रिलायन्सकडील हे छोटे वीज ग्राहक टाटा पॉवरकडे वळवण्याचा निर्णय राज्य वीज नियामक आयोगाने दिला होता.
या निर्णयाला केंद्रीय विद्युत अपिलीय लवादाने स्थगिती दिली आहे. परिणामी हे छोटे ग्राहक तूर्तास तरी रिलायन्सकडेच कायम राहणार आहेत.