एअर इंडियाच्या न्यूयॉर्ककडे निघालेल्या विमानाच्या उड्डाणाला आपल्यामुळे उशीर झाला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर आणि चुकीची माहिती देणाऱयांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर आता त्याच विमानातून प्रवास करणाऱया दोन प्रवाशांनी फडणवीस यांची बाजू उचलून धरली आहे. फडणवीस यांच्यामुळे त्या दिवशी विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला नव्हता, असे दोन प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

दुष्यंत नावाच्या व्यक्तीने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एअर इंडियाच्या एआय १९१ विमानातून त्या दिवशी मी सुद्धा प्रवास करीत होतो. मुख्यमंत्री आणि त्यांचे शिष्टमंडळ वेळेत विमानात दाखल झाले होते. इमिग्रेशनच्या काही अडचणींमुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला, अशी माहिती आम्हाला देण्यात आली. त्याच विमानातून प्रवास करणारे दुसरे एक प्रवासी अरविंद शहा यांनी सुद्धा फडणवीस यांच्यामुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला नसल्याचे म्हटले आहे. मी फडणवीस यांच्या मागच्याच जागेवर बसलो होतो. त्यांनी त्यांच्या जागेवरून कोणालाही फोन केला नाही किंवा उड्डाणासंदर्भात कसलीही चर्चाही केली नाही. ते पूर्णवेळ त्यांच्यासमोरील फाईल्स वाचण्यात दंग होते, असे शहा यांनी ट्विटवर लिहिले आहे. या दोन्ही प्रवाशांनी केलेली ट्विट फडणवीस यांनी रिट्विट केले आहेत. गुरुवारीच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात सविस्तर खुलासा केला होता. त्याचबरोबर दिशाभूल करून चुकीची माहिती देणाऱयांवर बदनामीचा खटला भरण्याचा इशाराही दिला होता.