क्वीन नेकलेसचे सौंदर्य कमी करणारे एलईडी दिवे काढून टाकण्यास उच्च न्यायालयाने सांगितल्याच्या पाश्र्वभूमीचा आधार घेत पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी तातडीने हे दिवे काढण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. भाजपने पुढाकार घेऊन लावलेल्या या दिव्याबाबत शिवसेनेने सुरुवातीपासून विरोधाची भूमिका घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर सेनेचे पारडे जड झाले आहे. केंद्राच्या योजनेनुसार चाळीस टक्के वीजबचत करणारे, पांढरा उजेड देणारे एलईडी दिवे मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्यावर लावण्यात आले. पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला डावलून भाजपने पुढाकार घेत या निर्णयाचे श्रेयही घेतले.
शहराच्या वाहतुकीसंदर्भात उच्च न्यायालयातील याचिकेदरम्यान न्यायालयानेच एलईडी दिवे सौंदर्य कमी करत असल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर शुक्रवारी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आयुक्त अजय मेहता यांना पत्र लिहून तातडीने सोडिअम व्हेपरचे पूर्वीचे दिवे लावण्याचे निर्देश दिले.