सर्वसामान्य मुंबईकरांना मुंबईमध्ये भाडेतत्वावर घर उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने घरकुल योजना आखली असून महापालिका आपल्या मोकळ्या भूखंडांवर म्हाडाच्या धर्तीवर ही योजना राबविणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत २०१३-१४ च्या अर्थसंकल्पास मंजुरी देताना या योजनेची घोषणा करण्यात आली. या संदर्भात लवकरच एक अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये महापालिकेचे अनेक भूखंड मोकळे भूखंड असून त्यापैकी काही भूखंडांवर अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. त्यामुळे मोकळ्या भूखंडांवर घरकुल योजना राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या योजनेत मोकळ्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या इमारतींमधील सदनिका सर्वसामान्य मुंबईकरांना भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत महसुलाची भर पडणार आहे.
ही योजना तडीस नेण्यासाठी लवकरच एका अभ्यास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. ही योजना कोणत्या भूखंडांवर आणि कोणत्या पद्धतीने राबवावयाची याबाबत हा अभ्यास आपल्या शिफारस करणार आहे. त्यानंतर ही योजना राबविण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले.