पडद्यावरचा अभिनय एवढीच संकुचित भूमिका आपली नाही. एक माणूस म्हणून विचार करणे, आपल्या वैचारिकतेची-मूल्यांची जपणूक करणे ही पहिली जबाबदारी, तर पत्नी म्हणून दोघांच्या नात्यातला सन्मान राखणे ही दुसरी जबाबदारी आहे. आई म्हणून केवळ मुलांना वाढविणे नाही तर आज त्यांना जे विचार देणार आहोत ते उद्या समाजापर्यंत पोहोचणार आहेत इतक्या खोल जाणिवेने वागणाऱ्या, वैचारिकतेची कास धरणाऱ्या ‘हसतमुख’ पण ‘शहाण्या’ रेणुकाची झलक त्यांच्या चाहत्यांना अचंबित करून गेली.

सलमान खानची ‘भाभी’ म्हणून आजही रेणुका शहाणे लोकप्रिय आहेत पण त्याच सलमानला ‘काळवीट शिकार’ प्रकरणी सोडल्यानंतर हे कसे झाले? म्हणून प्रश्न विचारणारी अभिनेत्री, राजकारण्यांच्या भूमिकेवरही तितक्याच निर्भीडपणे समाजमाध्यमातून ही अभिनेत्री प्रश्न करते. रेणुका शहाणे यांच्या एरवी हसतमुख चेहऱ्याचा समाजमाध्यमांवर असलेला हा वैचारिक दबदबा काय आहे, याचे उत्तर गुरुवारी ‘लोकसत्ता’ आयोजित ‘केसरी’ प्रस्तुत ‘व्हिवा लाउंज’च्या गप्पांच्या निमित्ताने चाहत्यांसमोर उलगडले.

शांता गोखले यांच्यासारखी लेखिका आई, घरात वैचारिक-अभ्यासाचे वातावरण असताना रेणुका शहाणे अभिनयाकडे कशा वळल्या याबद्दल त्यांनी अपघाताने झालेल्या या अभिनय प्रवासाच्या गमतीजमती उलगडून सांगितल्या. अभिनय हे त्यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून त्यांनी निश्चित केले असले तरी वैचारिकता जपण्याचा त्यांचा आग्रह त्यांनी कायम ठेवला आहे. ‘आत्मनिरीक्षण’ केले नाही तर आत्मविश्वास शक्य नाही. दुसऱ्यावर अवलंबून न राहात आत्मविश्लेषण करता आले तर तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला कधीही खाली पडू देणार नाही असा मंत्रही ‘मानसशास्त्र’ विषयाच्या पदवीधर असलेल्या रेणुका शहाणे यांनी दिला. हा मंत्र अभिनय कारकीर्द घडवितानाच नव्हे संपूर्ण आयुष्यासाठीही उपयोगी आहे, असे त्यांनी आपल्या अनुभवातून सांगितले.

‘सर्कस’च्याही आधी प्रायोगिक रंगभूमीशी जोडली गेलेली नाळ, टेलिव्हिजनमध्ये ‘सुरभी’च्या माध्यमातून मिळालेली लोकप्रियता, त्यानंतर या माध्यमात अभिनेत्री म्हणून झालेली जडणघडण आणि मग ‘हम आप कै है कौन’ नंतर घराघरांमधून मिळालेले प्रेम आणि ओळख या सगळ्याबद्दल त्यांनी भरभरूनगप्पा मारल्या. खरे तर सलमान खानची ‘भाभी’ म्हणून हिंदीत खूप लोकप्रियता मिळाली पण अभिनेत्री म्हणून त्याच प्रतिमेत अडकायला त्यांनी ठाम नकार दिला. अभिनेता आशुतोष राणा यांच्याबरोबर विवाहाचा निर्णय घेतल्यानंतर संसाराला त्यांनी प्राधान्य दिले. मात्र त्याच दरम्यान पटकथा लेखन व दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपली वाटचाल सुरू केली.

राजकारणी कधीच सत्य बोलत नाहीत

समाजमाध्यमांवर निर्भीडपणे मतमांडणी करणाऱ्या रेणुका शहाणे यांनी राजकारणी कधीच सत्य बोलत नाहीत असे स्पष्ट मत व्यत केले. आपल्याकडे अनेक गोष्टी राजकारण्यांच्या दृष्टिकोनातूनच पोहोचतात. त्यामुळे त्याबद्दल बोलताना सारासार विचार करूनच बोलले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आपल्या या निर्भीडपणाबद्दल बॉलीवूडकरांना काय वाटते याचा विचार आपण करत नाही. कारण कलाकार कधीच काही बोलत नाही. ते केवळ आपल्या सोयीने आणि आपल्या चित्रपटांसाठी बोलतात अशी टिप्पणीही त्यांनी जोडली.