पहाटेच्या वेळी एकटय़ा मुलीने रेल्वे स्थानकात उतरणे किती धोकादायक ठरू शकते, हे इस्थर अनुह्या हत्या प्रकरणाने समोर आले होते. तसाच काहीसा प्रसंग कर्नाटकातून पळून मुंबईत आलेल्या एका १८ वर्षीय तरुणीवर येण्याचा धोका होता. पण एकाकी बसलेल्या या तरुणीकडे दादर स्थानकातील पोलिसांचे लक्ष गेल्यानंतर त्यांनी तिची विचारपूस करत तिला मदत केली आणि तिच्या कुटुंबियांची भेट घालून दिली.
यामिनी (१८) ही तरुणी कर्नाटकातील एका खेडय़ातील शेतकऱ्याची मुलगी. तिचे लग्न ठरले होते. परंतु मुलगा पसंद नसल्याने तिचा विरोध होता. त्यामुळे ती कुणाला न सांगता घरातून पळून गेली. तिने कसलाच विचार केला नव्हता पण ती गाडी पकडून सरळ मुंबईला आली. १३ एप्रिल रोजी पहाटे दादर स्थानकात उतरली. मुंबईत पोहोचल्यावर ती येथील वातावरणामुळे बावरली. सुदैवाने बंदोबस्तावर असणाऱ्या माटुंगा पोलीस ठाण्याच्या घाडगे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने यामिनीची अवस्था पाहिली आणि त्वरित महिला पोलिसांना पाचारण केले. माटुंग्याच्या पोलीस उपनिरीक्षक पद्मश्री पाटील यांनी तिची विचारपूस केली. मुंबईत तिचे कुणी नातेवाईक नव्हते. मोडक्या तोडक्या हिंदीत तिने संवाद साधला .त्यानंतर पाटील यांनी कर्नाटकातील गुलबर्गा नियंत्रण कक्षाला संपर्क करून तिच्या कुटुंबियांना शोधून काढले .