उन्हाळी सुटीत कोकणातल्या आपल्या ‘गावाक’ जाण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वेच्या विशेष गाडय़ांनी पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. पहिल्यांदाच कोकणात जाणाऱ्या तात्काळ विशेष गाडय़ांची आरक्षणे दोन मिनिटांत फुल्ल झाल्याने प्रवाशांना शयनयान श्रेणीची तिकिटे मिळणेही दुरापास्त झाले आहे. याआधीही कोकणच्या प्रवासासाठी सज्ज झालेल्या प्रवाशांना असाच अनुभव आल्याने रेल्वेच्या दलालविरोधी कारवाईचा नेमका उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाच्या उन्हाळ्यात वातानुकूलित डबलडेकर गाडी धावण्याची शक्यता मावळल्यानंतर मध्य रेल्वेने पहिलीवहिली तात्काळ विशेष गाडी कोकणात चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र या गाडय़ांची घोषणा आरक्षण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी करण्यात आली. परिणामी प्रवाशांना शुक्रवारी सकाळच्या वर्तमानपत्रांतूनच या गाडय़ांबाबत माहिती मिळाली. प्रवाशांनी तातडीने ९ व १० मेच्या गाडय़ांसाठी आरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आठ वाजता आरक्षण सुरू झाल्यावर पुढील दोन ते तीन मिनिटांत लोकांच्या हाती प्रतीक्षा यादीतील तिकिटे आली.
गोवंडी येथे राहणाऱ्या केशव राणे यांनी कुडाळ येथे जाण्यासाठी ९ मेचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. राणे यांनी सकाळी आठच्या आधीच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर लॉग-इन केले होते. मात्र शयनयान श्रेणीचे तिकीट काढेपर्यंत ८.०२ वाजेपर्यंत सर्व आरक्षणे फुल्ल झाली होती. हाच अनुभव ठाण्यात राहणाऱ्या कौस्तुभ कुडाळकर यांनाही आला. या गाडीबाबत खूपच कमी लोकांना गुरुवारी संध्याकाळी माहिती मिळाली होती. मग अशा वेळी एवढय़ा झटक्यात आरक्षण फुल्ल कसे झाले, असा प्रश्न आता प्रवासी उपस्थित करत आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही दलालीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे दलालांविरोधात कठोर कारवाई करत असल्याचा दावा करते, मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत काहीच सुधारणा होत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.