कांदिवलीतील डहाणूकर वाडीच्या रहिवाशांची डोकेदुखी

मोठय़ा रस्त्यांसाठी पादचारीकेंद्रित पदपथ धोरण योग्य असले तरी मुंबईत अरुंद रस्त्यांवरील पदपथ पादचाऱ्यांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ ठरत आहेत. सध्या कांदिवली पश्चिम येथील डहाणूकर वाडी परिसरातील रहिवाशांचा अरुंद रस्त्यांमुळे असा ‘खोळंबा’ होत असून त्यांनी येथील गैरसोयीचे ठरणारे पदपथच हटविण्याची मागणी पालिकेकडे केली आहे.

‘माझ्या आईवडिलांनाही मुंबईच्या पदपथांवरून चालण्याची भीती वाटते’ अशी कबुली देत महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शहरातील पदपथांची दुर्दशा मान्यच केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने डिसेंबर २०१६मध्ये शहरातील पदपथ पादचारीपूरक करण्यासाठी धोरण आणले. रस्त्यावरील पहिला अधिकार पादचाऱ्यांचा असल्याचा मान्य करून पदपथ धोरण आखले गेले आहे. परंतु, अरुंद रस्ते, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि त्यात पदपथांची चित्रविचित्र आणि पादचारीविरोधी रचना यामुळे हे धोरण कागदावरच राहिले आहे. अनेक ठिकाणी इमारतींचे प्रवेशद्वार, रस्त्यांची उंची लक्षात न घेताच हे पदपथ बांधले जातात. त्यावरील चढउतारांमुळे त्यावरून सलग चालताच येत नाही. त्यामुळे हे पदपथच नको, असा आग्रह डहाणूकर वाडीतील रहिवाशांनी धरला आहे.

डहाणूकरवाडी येथील रहिवाशांनी या पदपथांविरोधात नोंदवलेला विरोध हे याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. डहाणूकरवाडीतील समीर चंदावरकर मार्ग, गोखले रोड, दत्तमंदिर रोड हे अरुंद रस्ते आहेत. या रस्त्यावरील गटारांवर आच्छादन असावे आणि पादचाऱ्यांची सोय व्हावी यासाठी येथे पदपथ बांधण्यात आले आहेत. गेल्याच महिन्यात त्यांचे नूतनीकरणही झाले. मात्र या पदपथांमुळे गैरसोय होत असल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे.

‘नियमांनी हात बांधले’

पालिकेच्या रस्ते विभागातील एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पादचाऱ्यांच्या हक्काला प्राधान्य देत आम्हाला रस्ते आणि पदपथ बांधावे लागतात. ‘इंडियन रोड्स काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजूंनी किमान दीड मीटर रुंदीचे पदपथ असणे गरजेचे आहे.

हे तत्त्वत लागू झाल्यास सहा मीटरच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंचे पदपथ धरता केवळ तीन मीटर रुंदीचा रस्ता उरेल. पण हे नियम पालिका स्तरावर बदलता येणार नाहीत,’ असे पालिकेच्या या अधिकाऱ्याने सांगितले. ‘अर्थात काही ठिकाणी पदपथाच्या समोर अनधिकृतपणे वाहने उभी केल्यामुळे पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालावे लागते व इतर वाहनांना त्रास होतो, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे या प्रश्नावर परिस्थितीनुरूप तोडगा काढला गेला पाहिजे,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली.

वाहतुकीलाही अडथळा

‘येथील पदपथावर दर पाच मीटरवर इमारतींची प्रवेशद्वारे आहेत. त्यामुळे पदपथावरून चालताना सतत चढउतार करावी लागते. पदपथावरील गटाराची झाकणे एकदा उघडल्यावर पुन्हा नीट बसविली जात नाहीत. अनेकदा ती तुटतात. त्याचाही पदपथावरून चालताना त्रास होतो. इथले रस्ते इतके अरुंद आहेत की पदपथासमोर एखादी गाडी लावल्यास दुसऱ्या गाडीला जाण्याएवढाही रस्ता शिल्लक राहत नाही.

स्थानिक नगरसेवक, आमदार, प्रभाग कार्यालयात अनेकदा फेऱ्या मारल्या. मात्र समस्या दिसत असूनही केवळ नियमावर बोट ठेवले जाते,’ अशी तक्रार डहाणूकरवाडीतील रहिवासी प्रभाकर बेलोसे यांनी केली.

‘रहिवाशांचीच मागणी’

‘डहाणूकरवाडीमध्ये गेल्या दहा वर्षांत इमारतींचे मजले वाढले. रहिवाशांकडील वाहने वाढली. त्यामुळे नवी इमारत बांधताना तेथील काही जागा ताब्यात घेऊन रस्ते रुंद करण्यात यावेत, असे मी सुचवले होते. मात्र प्रशासनाने त्याला नकार दिला. या अरुंद रस्त्यांवर पदपथ ठेवू नयेत, या म्हणण्याला दोन्ही बाजूच्या इमारतीमधूनच विरोध झाला. पदपथ नसले तर इमारतींच्या कुंपणभिंतींवर गाडय़ा आदळतील, अशी त्यांना भीती होती. त्यामुळे आधीचे अधिक उंचसखल असलेले पदपथ नूतनीकरणाव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नव्हता,’ असे येथील नगरसेविका शैलजा गिरकर यांनी सांगितले.