देशातील निम्म्याहून अधिक श्रीमंत ग्राहकांनी २०१५ मध्ये चैनबाजीवर (ऐच्छिक खर्च) मोठी रक्कम बाजूला काढण्यासाठी नियोजन पक्के केले आहे. यासंदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला.
देशातील सुमारे ६० टक्के श्रीमंत ग्राहकांनी येत्या वर्षांसाठी लागणारी ऐच्छिक खर्चापोटीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनेकांनी तसे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतातील अशा ग्राहकांचा क्रमांक चीनखालोखाल आहे, असे ‘व्हिसा’ या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे. सप्टेंबर २०१३ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले. परंतु यासाठी किती लोकांशी संवाद साधण्यात आल्याचा आकडा मात्र ‘व्हिसा’ने प्रसिद्ध केलेला नाही.
अभ्यासातील आकेडवारीनुसार, देशातील १० श्रीमंतांपैकी सरासरी ९ ग्राहक महिन्याकाठी जेवण, पब, डिस्को पार्टीवरील खर्चासाठी तसेच कपडय़ांची खरेदी आणि सुटीसाठी २५ हजार रुपये बाजूला काढत असतात. श्रीमंतांच्या या खर्चातील ९२ टक्के पंचतारांकित हॉटेलमधील जेवण, ८० टक्के कपडय़ांवर, ७९ टक्के कुटुंब सहलीवर आणि ६८ टक्के इतका वाटा दागिन्यांवर खर्च होतो.
ऐच्छिक खर्चात वाढ करायची आहे अशा ६० टक्के श्रीमंतांपैकी ४९ टक्के श्रीमंत कुटुंब सहलींवर खर्चावर भर देतात. तर ४५ टक्के ग्राहक हे दर्जेदार खानपानावर खर्च करत असतात. आगामी वर्षांसाठी अशा ग्राहकांनी आपल्या ऐच्छिक खर्चात वाढ करण्यासाठी नियोजन केले आहे. या खर्चात आणखी काही वाढ करण्यासाठी ते आशादायी आहेत, असे मत ‘व्हिसा’च्या उदयोन्मुख बाजार विभागाचे भारतासाठीचे व्यवस्थापक उत्तम नायक यांनी व्यक्त केले.
घरखर्चासाठी वर्षांकाठी ४ लाख
खर्चाबरोबरच आगामी वर्षांत बचतीवर काहींनी भर दिला आहे. यात १० पैकी ७ जणांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे. खर्च आणि उत्पन्नवाढीचे लक्ष्यही त्यांच्यासमोर असते. तरीही बचतीपेक्षा खर्चावर अधिक भर देण्यात आला आहे. घरातील फर्निचर, रंगरंगोटी, दुरुस्ती तसेच इतर उपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी वर्षांला ४ लाख ६० हजार रुपये श्रीमंत ग्राहक खर्च करीत असतात, असे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.