उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना ढगाळ वातावरणामुळे चार दिवसांचा दिलासा मिळाला असला तरी सोमवारी ढगांची ही छाया विरळ होणार आहे. मंगळवारी आकाश पुन्हा एकदा निरभ्र होणार असून तापमानही ३५ अंश सेल्सिअसच्या घरात जाणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान शनिवारपेक्षा रविवारी तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीनजीक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेले चार दिवस संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण होते. दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी एखाद्या शिडकाव्याव्यतिरिक्त पाऊस आला नाही. या ढगाळ वातावरणाने दुपारचे तापमान मात्र फार वर जाऊ दिले नाही. शनिवारी कुलाबा येथे २८.३ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे ३१.५ अंश सेल्सिअस तापमान होते. या दोन्ही ठिकाणी रविवारी पारा दोन ते तीन अंशाने वर चढला. रविवारी दुपारी कुलाबा येथे ३२.२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. गेल्या आठवडय़ात पारा ३६-३७ अंशांवर गेल्याने भाजून निघालेल्या मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला होता, पण आता पुन्हा एकदा तापमान वाढत असल्याने उकाडय़ाचा त्रास होणार आहे. सोमवारी आकाश ढगाळलेले राहील आणि तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात थंडीचे आगमन झाले असून मध्य भारतातही येत्या तीन दिवसांत तापमान कमी होणार असल्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. मात्र सध्या वाऱ्यांची दिशा ही पूर्वेकडून असल्याने उत्तरेतील हा गारवा राज्यात आणि मुंबईत एवढय़ा लवकर येण्याची शक्यता नाही.