स्वयंचलित लॉकिंग प्रणाली आहे म्हणून तुम्ही निश्चिंतपणे कार कुठेही उभी करून निर्धास्तपणे जात असाल तर सावधान! ही लॉकिंग प्रणाली अवघ्या दोन ते अडीच मिनिटांमध्ये तोडून कार पळविण्याचे तंत्रही आता चोरटय़ांनी मिळवले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अशाच एका चोरटय़ाला पकडले असून मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या गाडय़ा पळवून त्या गुजरात, राज्यस्थानमध्ये ३० ते ८० हजार रुपयांना विकत असल्याचेही आढळून येत आहे. खार, मुलुंड, नागपाडा येथून रात्री ११ ते पहाटे २ च्या दरम्यान कार चोरीला गेल्याच्या तक्रारी मुंबई पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. यातील काही कार चावीच्या साहाय्याने उघडणाऱ्या तर काहींना मध्यवर्ती लॉकिंग प्रणाली होती. या चोरींचा तपास करताना खारमधील कारचोरीचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले. ते पाहून पोलीसही हादरले. कारमधून आलेली एक व्यक्ती जी कार चोरायची आहे ती अवघ्या दोन ते अडीच मिनिटांमध्ये पळवून नेत असल्याचे दिसून आले. गुन्हे शाखेच्या मोटार वाहन चोरीविरोधी पथकाने याचा माग काढण्यास सुरुवात केली. तेव्हा हवालदार नारायण माईनकट्टे आणि संजय सोनकांबळे यांना अशी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जोगेश्वरीच्या वैशालीनगरमध्ये दडून बसल्याची खबर मिळाली आणि पथकाने तातडीने कारवाई करत अय्युब अली ऊर्फ इलेक्ट्रिक गुड्ड (३९) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कारचे लॉक तोडण्यापासून मध्यवर्ती लॉकिंग असलेले सíकट निष्प्रभ करण्यासाठी असलेला एसीएम बॉक्सही सापडला. तसेच तीन झेन आणि प्रत्येकी एक इनोव्हा, टवेरा, आय-२०, स्विफ्ट डिझायर आणि सॅन्ट्रो अशा आठ चोरीच्या कार आणि ८१ बनावट चाव्याही हस्तगत केल्या.

कधी बनावट चावी तर कधी एसीएम बॉक्सची मदत
इलेक्ट्रिक गुड्ड त्याला चोरायची असलेल्या कारवर नजर ठेवत असे. रात्री ११ ते पहाटे २ च्या दरम्यान या कारजवळ आपली कार तो उभी करीत असे. पकडीने डिक्कीचे लॉक उचकटून त्याला लागणारी चावी तो स्वतच्या कारमध्ये बसून बनवत असे आणि मग बनावट चावी तयार झाली की ती कार घेऊन पोबारा करीत असे. दुसऱ्या पद्धतीत कारची काच फोडून बोनेट खोलून त्यात सेंट्रल लॉकिंगसाठी बसविण्यात आलेला एसीएम बॉक्स स्वतकडे असलेल्या बॉक्सने बदलत असे. या एसीएम बॉक्समध्ये भरलेल्या माहितीशी कोिडग केलेल्या चावीनेच या कार उघडतात. पण गुड्डकडे असलेला बॉक्स हा कोरा असल्याने तो बसविल्यानंतर कारला कुठलीही चावी लावली की ती चालू होते, अशी माहिती पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांनी दिली.

मुंबईतून गाडी गुजरात, राजस्थानमध्ये?
चोरलेल्या गाडय़ा कधी जोगेश्वरी परिसरात लपवून ठेवणे तर कधी चोरल्यापासून लगेचच तिला दहिसरमाग्रे गुजरातला नेण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आय२० (३० हजार रुपये), टवेरा (४० हजार), इंडिगो (४० हजार), स्विफ्ट डिझायर (३० हजार), इनोव्हा (८० हजार) अशा कवडीमोल भावांत या कार विकल्या जात आहेत. चोरलेल्या गाडय़ांचा वापर गुजरात, राजस्थानमध्ये अनधिकृत कामांसाठी केला जात असण्याची दाट शक्यता असून त्याचा तपास पोलीस करीत आहेत.

कारमालकांनो, हे करा!
* कारला वाहन चोरीविरोधी यंत्रणा (अँटी थेफ्ट डिव्हाईस) लावून घ्या, तसेच गिअर लॉकही जरूर बसवावा.
* कार इमारतीमध्ये उभ्या करीत असाल तर सीसीटीव्हीचे त्यांच्यावर लक्ष राहील याची काळजी घ्या.
* इमारतीचा सुरक्षारक्षक किंवा अन्य कोणाकडे कार धुण्यासाठी चावी देऊ नका.