थॉमस पिकेटी या वेगळी वाट चोखाळणाऱ्या अर्थतज्ज्ञाचे वर्णन ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकाने आजच्या काळाचे कार्ल मार्क्स असे केले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी मार्क्स याने ‘दास कॅपिटल’ या ग्रंथाद्वारे भांडवलशाही व्यवस्थेच्या मर्यादांची तात्त्विक मांडणी केली तर एकविसाव्या शतकात पिकेटी याने लिहिलेला ‘कॅपिटल’ हा ग्रंथ संपत्ती निर्मिती क्षमता आणि उत्पन्नातील असमतोल यावर सखोल भाष्य करतो. आर्थिक प्रगतीसाठी ‘खालून वर’ या धोरणास महत्त्व देतात. म्हणजे इजिप्तमधील पिरॅमिडच्या रचनेप्रमाणे पाया अधिकाधिक मजबूत करीत वरवर जात राहायचे. अर्थअभ्यासक या दोन दृष्टिकोनांत विभागलेले आहेत. हे मतभेद बाजूस ठेवून प्रगत देशांचा अभ्यास केल्यास सेन यांच्या धोरणविचारास पुष्टी मिळते. ज्या देशांनी खालून वर ही पद्धती अवलंबिली ते अधिक प्रगत झाले आणि त्या देशांतील संपत्ती वितरणांत कमी असमानता निर्माण झाली. खालून वर मार्गाने सधन होणाऱ्या देशांत सामाजिक प्रगतीचे निकषही अधिक सशक्त आढळले. म्हणजे गरीब, अप्रगत अशांना आधार देणाऱ्या व्यवस्था. त्या वरून खाली असे धोरण अवलंबिणाऱ्या देशांत जवळपास नसतात. आपल्याकडील परिस्थिती अशी का आहे हे यावरून कळावे. या व्यवस्थेचा आणखी एक परिणाम असा की वरून खाली असा दृष्टिकोन असणारे वा आपल्याइतकी विषमता असणारे देश आर्थिक प्रगती वेगाने करू शकत नाहीत. या अशा देशांतील अर्थविकास मुंगीच्या गतीने होतो. या अशा देशांत शिक्षण, आरोग्य आदी महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांतील गुंतवणुकीसाठी पुरेसा निधीच नसतो. आपल्याकडे कोणतेही सरकार आले तरी (यास विद्यमान अपवाद नाहीत) शिक्षणासाठी एकूण अर्थसंकल्पात चार टक्कय़ांपेक्षा अधिक निधी खर्च करू शकत नाहीत. यामुळे पिकेटी यांची ही मांडणी म्हणूनच अस्वस्थ करणारी ठरते. आपला एकंदर राष्ट्रीय लौकिक लक्षात घेता या पाहणीच्या निष्कर्षांच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करण्याऐवजी पिकेटी यांनाच कसे काही कळत नाही आणि ते कसे भारतविरोधी आहेत याचे युक्तिवाद भक्तसंप्रदायाकडून सुरू होतील. परंतु भारताची ही अवस्था दाखवून देणारे पिकेटी एकटेच नाहीत. क्रेडिट सुईस ही मोठी आंतरराष्ट्रीय बँक असो वा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारखी संस्था. या सगळ्यांनीच अलीकडच्या काही काळात भारतातील वाढत्या विषमतेचे भयावह चित्र रेखाटले आहे, असे मत ‘पिकेटी आणि प्रगती’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत नवी मुंबई येथील दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहन पिंगळ हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत कांदिवली येथील अर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव दाभोळकर याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या रोहन आणि वैभव यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली.रोहनला सात हजार आणि प्रमाणपत्र तर वैभवला पाच हजार  रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.