चर्चगेट-डहाणू लोकलमध्ये दादागिरी करणाऱ्या प्रवाशांच्या टोळक्याला बुधवारी रात्री रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) पोलिसांनी चांगलाच चोप दिला. मात्र, डहाणुच्या प्रवाशांनी ही कारवाई राजकीय दबावापोटी करण्यात आल्याचा आरोप केल्याने याप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. चर्चगेटहून ८.२७ वाजता सुटणारी डहाणू लोकल रात्री १०.३०च्या सुमारास विरार स्थानकात पोहचली. तेव्हा आरपीएफच्या पोलिसांनी ट्रेनमध्ये चढून काही प्रवाशांना मारहाण केली.  प्रवाशांचे हे टोळके विरार स्थानकात प्रवाशांना ट्रेनमधून उतरू देत नसे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत आरपीएफकडे तक्रारी येत होत्या. मुंबई सेंट्रल, दादरहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून विरारचे बरेच लोक प्रवास करतात. त्याचा त्रास डहाणूपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना सोसावा लागतो. त्यामुळे या टोळक्याने मंगळवारीही लोकल डहाणूच्या दिशेने जात असताना विरारच्या प्रवाशांना उतरू दिले नव्हते. त्यामुळे विरारच्या प्रवाशांना वैतरणा स्थानकात उतरावे लागले होते. सातत्याने येत असलेल्या या तक्रारींमुळे अखेर आज आरपीएफच्या पोलिसांनी या टोळक्यावर कारवाई केली. या कारवाईच्यावेळी टोळक्याने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरपीएफला या प्रवाशांवर लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, आरपीएफने याप्रकरणी १४ प्रवाशांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर चेन ओढून गाडी थांबवणे, सरकारी कारवाईत अडथळा आणण्याचे आरोप दाखल करण्यात आले आहेत.