रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केंद्रातील मंत्रीपदाचा हट्ट सोडून राज्यात कॅबिनेट मंत्रीपद स्वीकारावे, हाच भाजपचाही हेका कायम असल्याने पक्षाच्या अन्य नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची खात्री वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे किमान मोक्याची व महत्त्वाची महामंडळे तरी मिळावीत, यासाठी रिपाइंने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यानुसार पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा महत्त्वाच्या महामंडळांची मागणी केल्याचे सांगण्यात आले.
मंत्रीपद नाही, निदान महामंडळे तरी चांगली मिळावीत, यासाठी रिपाइं नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यानुसार दोन मागास वर्गीय आर्थिक विकास महामंडळे, सिडको, मुख्य म्हाडा किंवा विभागीय म्हाडा यांपैकी एक, लघुउद्योग, तीन पैकी एक वैधानिक विकास मंडळे, इत्यादी आठ ते दहा मंडळे व महामंडळांची यादी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.