राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना उपदेशाचे बोधामृत पाजायचे ठरविले असून २ डिसेंबरला हिवाळी शिकवणी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये हा अभ्यासवर्ग होणार असून सरकार्यवाह भैय्याजी जोशी हे सर्वाना मार्गदर्शन करतील. नेत्यांनी सार्वजनिक जीवनातील कसे वर्तन ठेवावे, यासह अनेक बाबींवर ते मार्गदर्शन करतील.
राज्यात १५ वर्षांनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आहे. १९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आले आणि त्यांनी केलेल्या चुकांमुळे पुन्हा सत्ता तर आली नाहीच आणि इतकी वर्षे सत्तेसाठी वाट पहावी लागली. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, कशापध्दतीने राज्य कारभार करावा, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेच्या मोठय़ा अपेक्षा असून त्यासाठीच काँग्रेसला हटवून निवडून दिले आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने केवळ हवेतच न राहता, ती कशी पूर्ण करता येतील आणि जनतेचा विश्वास कसा टिकविता येईल, याचा विचार सरकारने केला पाहिजे. मध्यप्रदेशसारख्या राज्याने विकासाचे जे उदाहरण सर्वासमोर ठेवले आह, त्याचा अभ्यास करून महाराष्ट्रातील सरकारनेही जनतेला विकासाच्या मार्गावर नेले पाहिजे.
मंत्र्यांनी सार्वजनिक जीवनातील वर्तन आणि वक्तव्ये याविषयी नीट काळजी घेतली पाहिजे. त्यातून जनतेची सरकारविषयीची प्रतिमा बनत असते. बेतालपणे कृती किंवा वर्तन केल्यास सरकारची प्रतिमा बिघडले व जनतेच्या विश्वासाला धक्का बसतो. याचे भान ठेवून आणि संघाच्या सेवाकार्याला पूरक अशी कृती सरकारने वेळोवेळी करावी व विकासाचे उद्दिष्ट साध्य करावे, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने या वर्गात चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.