देशहिताचा विचार करून सत्तापरिवर्तन घडविणे, ही गरज असल्याने लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सक्रिय सहभाग घेतला. पण आता विधानसभा निवडणुकीत तेवढा सहभाग घेतला जाणार नाही, अशी भूमिका संघनेतृत्वाने घेतल्याने महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेल्या सर्व विधानसभा निवडणुका भाजपला आपल्याच ताकदीवर लढवाव्या लागणार आहेत.
राष्ट्रहिताच्या दृष्टीने समाजकारण आणि जनसेवा हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या संघाने देशात सत्तापरिवर्तन घडविण्यासाठी सक्रियपणे काम केले. मतदार नावनोंदणीपासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आणि बूथनिहाय काम करण्यासाठी संघ स्वयंसेवक उतरले होते. हे केवळ लोकसभेपुरतेच आणि अपवादात्मक परिस्थिती असल्याचे कार्यकर्त्यांना स्पष्ट करण्यात आले होते. पण राजकारण किंवा सत्ताकारणातून समाजपरिवर्तन व विकासाच्या मार्गाची कास धरल्याने राष्ट्र झाल्यानंतर आता राज्यातही परिवर्तनाची कास धरली जाणार का, विधानसभा निवडणुकीत संघाचा सहभाग किती असेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची निवड झाल्यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूर येथे जाऊन शुक्रवारी भेट घेतली. त्यात विधानसभा निवडणुकीनिमित्ताने काही राजकीय चर्चा झाली आणि त्यानंतर शहा यांनी भाजपच्या नेत्यांशीही सविस्तर चर्चा केली.
विधानसभा निवडणुकीत संघाची लोकसभेप्रमाणे मदत होणार नाही, असे संकेत संघनेतृत्वाने शहा यांना दिले. जरी हे त्या निवडणुकीच्या वेळीच ठरले होते, तरी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची गेली १५ वर्षे असलेली सत्ता उलथून टाकण्यासाठी विधानसभा निवडणुकीतही संघाचा सक्रिय सहभाग असेल, असे अपेक्षित होते. मात्र आता राजकारणात न पडता मूळ उद्देशानुसारचे कार्य करण्याची भूमिका संघाने घेतल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे राज्यात भाजपचे नेतृत्व कमकुवत झाले असताना आता संघाचा ‘हात’ ही साथ करणार नसल्याने त्याचा भाजपला निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची गेली १५ वर्षे असलेली सत्ता उलथून टाकण्यासाठी विधानसभा निवडणुकीतही संघाचा सक्रिय सहभाग असेल, असे अपेक्षित होते. मात्र आता राजकारणात न पडता मूळ उद्देशानुसारचे कार्य करण्याची भूमिका संघाने घेतल्याने भाजपची पंचाईत झाली आहे.