सरकारी यंत्रणेला आपल्या नागरिकांच्या प्रती अधिक उत्तरदायी करण्याच्या उद्देशाने ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) ‘टेकफेस्ट’ या तंत्र व विज्ञान महोत्सवाअंतर्गत ‘आस्क’ या माहिती अधिकारावरील जाणीवजागृती मोहिमेला शुक्रवारी स्वातंत्र दिनाच्या मुहूर्तावर सुरूवात करण्यात आली.
टेकफेस्टमध्ये सामाजिक जाणीवा रूजविण्याकरिता दरवर्षी एक सामाजिक उपक्रम राबविला जातो. यंदा माहिती अधिकाराबाबत जागरुकता निर्माण करण्याचा आयोजक विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे. केंद्रीय माहिती आयोगाचे माजी आयुक्त शैलेश गांधी आणि ‘नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राईट टू इन्फॉर्मेशन’चे (एनसीपीआरआय) समन्वयक भास्कर प्रभू यांच्या उपस्थितीत पवई येथील संस्थेच्या सभागृहात या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. अभिनेत्री प्राची देसाई यावेळी उपस्थित होती. माहिती अधिकाराखाली माहिती मिळविणे किती सोपे आहे, याची जाणीव गांधी यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
टेकफेस्टचा हा उपक्रम देशभरातील १४ शहरातील ५० महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे.