गच्चीवरील हरितगृहात वाहत्या पाण्यात भाज्यांची लागवड

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात घरे, इमारतींसाठी जागा पुरत नसताना या महानगरात शेतीचा मुद्दा तर विचारातही येऊ शकत नाही. परंतु, माटुंग्यातील रुईया महाविद्यालयातील एका अभ्यासक्रमाच्या गटाने मातीविना शेतीचा यशस्वी प्रयोग करून शेतीबद्दलच्या विचारांना नव्याने चालना दिली आहे. महाविद्यालयाच्या गच्चीवर उभारण्यात आलेल्या एका हरितगृहात वाहत्या पाण्यात करण्यात आलेल्या लागवडीतून या ठिकाणी पालक, पुदिना, दुधी भोपळा, टोमॅटोसारख्या भाज्या/फळभाज्या निर्माण केल्या जात आहेत.

शेती व्यवसायाच्या या उतार-चढावाला स्थिर करण्यासाठी या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू आहे. देशातील कृषी विज्ञान संस्था असतील किंवा विविध वैज्ञानिक संस्थांमध्ये संशोधन सुरू आहे. यातच आता अनेक महाविद्यालयेही या विषयावर संशोधन करू       लागली आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये याबाबतचे पदवी अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. रुईया महाविद्यालयात हरितगृह व्यवस्थापन या विषयातील पदवी शिक्षण सुरू करण्यात आले आहे. याच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून महाविद्यालयाच्या गच्चीवर एक हरितगृह तयार करण्यात आले आहे. या हरितगृहात नुकताच एक यशस्वी प्रयोग करण्यात आला असून यामध्ये मातीशिवाय शेती करण्यात आली आहे. या पद्धतीला शास्त्रीय भाषेत हायड्रोपोनिक पद्धती असे म्हटले जाते. पारंपरिक पद्धतीत ज्याप्रमाणे रोपाची मूळ मातीत असतात त्याप्रमाणे या पद्धतीत रोपाची मूळ पाण्यात ठेवली जातात. यामध्ये वाहते पाणी असते. या पाण्यामध्ये त्या पिकाला आवश्यक असलेले पोषक द्रव्ये टाकलेली असतात. याला न्यूट्रियन असे म्हटले जाते.

पिकाची वाढ बरोबर होत आहे की नाही हे पाहण्यासाठी दर दोन दिवसांची त्यांची वाढ मोजली जाते व त्याच्या वाढीच्या आवश्यकतेनुसार न्यूट्रियन वाढविले जातात, अशी माहिती हा प्रयोग यशस्वीपणे करणाऱ्या व विभागातील प्राध्यापक डॉ. श्रुतिका कुमठेकर यांनी सांगितले.

हरितगृह तंत्रज्ञानामार्फत भाज्यांचे उत्पादन केल्यास त्यांचे हवेतून येणाऱ्या रोगांपासून संरक्षण होते. याचबरोबर मातीतील बुरशी किंवा इतर जिवाणूंमुळे होणारे रोगही होत नाहीत. तसेच आम्ही केलेल्या प्रयोगात पिकाची वाढ ही जलदगतीने होते यामुळे ठरावीक वेळात पारंपरिक शेतीपेक्षा ३० टक्के जास्त उत्पादन घेता येणे शक्य होते. या भाज्यांमध्ये मातीत उत्पादन झालेल्या भाज्यांइतकेच प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात.

– डॉ. श्रुतिका कुमठेकर, प्राध्यापक रुईया महाविद्यालय

शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

हा प्रयोग महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकत असलेले १२० विद्यार्थी आणि शिक्षक विभागप्रमुख डॉ. ज्योती पायस यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला असून आता आम्ही आमच्या प्रयोगशाळेत न्यूट्रियन विकसित करण्यावर भर देत आहोत. जेणेकरून या उत्पादनासाठी लागणारी गुंतवणूक कमी होईल. तसेच या प्रयोगाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आम्ही भविष्यात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करणार आहोत. तसेच त्यांना येथे प्रशिक्षण कसे देता येईल याबाबतही विचार करीत असल्याचे डॉ. कुमठेकर यांनी स्पष्ट केले.