एल्फिन्स्टन स्थानकातली चेंगराचेंगरी का व कशी घडली हे स्पष्ट करण्यासाठी दादर पोलिसांनी आतापर्यंत सर्व जखमींचे जबाब नोंदवले आहेत. पोलीस आता चेंगराचेंगरीच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या पण जखमी न झालेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवणार आहेत. दरम्यान, आतापर्यंतच्या जबाबांमधून पूल पडल्याच्या किंवा शॉर्टसर्किट झाल्याच्या अफवेचा उल्लेख पुढे आलेला नाही, अशी माहिती पोलिसांकडून मिळते.

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचा आकडा २३ वर

अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार अपघाती मृत्यूची नोंद घेत पुढील चौकशी व तपास सुरू आहे. सर्वप्रथम जखमी, साक्षीदारांचे जबाब नोंदवून, उपलब्ध चित्रफितींचा अभ्यास करून ही घटना कशी घडली, नेमकी कोणती परिस्थिती या घटनेला जबाबदार आहे याची माहिती दादर पोलीस घेत आहेत. दादर पोलिसांनी घटनेनंतर पंचनामे व अन्य प्रक्रिया आटोपून जखमींचे जबाब नोंदवले.

रेल्वे दुर्घटनेवरून राजकीय उद्रेक

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ४० जणांचे जबाब नोंदवून पूर्ण झाले आहेत. बहुतांश जबाब जखमींचे आहेत. यात कुठेही पूल पडला किंवा शॉर्टसर्किट घडले अशी अफवा उडून रेटारेटी झाल्याचे कोणीही सांगितलेले नाही. मात्र त्यावरून अफवा उडाल्याच नाहीत हे स्पष्ट सांगता येत नाही. त्यामुळे जास्तीतजास्त साक्षीदारांचे जबाब नोंदवून, माहिती गोळा करून निष्कर्षांवर पोचता येईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पोलिसांच्या हाती आलेल्या बहुतांश चित्रफिती घटना घडून गेल्यानंतरच्या आहेत. प्रत्यक्ष घटना घडतानाचे चित्रण पोलिसांकडे नाही.