एस. टी. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटने’च्या शिष्टमंडळातर्फे येत्या सोमवारी मुंबईत ‘वाहतूक भवन’ येथे एस. टी. अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेण्यात येणार आहे. या भेटीप्रसंगी बहुसंख्य कामगार रजा घेऊन उपस्थित राहणार असल्याने या दिवशी एस. टी. वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.
२०१२ ते २०१६ या वेतन करारातील सुमारे ५०० कोटी रुपयांची थकबाकी तसेच वेतन कराराच्या तरतुदीनुसार जानेवारी २०१३ ते सप्टेंबर २०१३ या कालावधीतील ८ टक्के वाढीव महागाई भत्याची ७१ कोटींची थकबाकी आणि जुलै १३ ते ऑक्टोबर १३ या चार महिन्यांची १० टक्के वाढीव महागाई भत्याची ४० कोटी रुपयांची अशी एकूण १२२ कोटी रुपयांची थकबाकी कामगारांना अद्याप देण्यात आलेली नाही.
या रकमेचे वाटप १० फेब्रुवारीपूर्वी करावे, असे लेखी पत्र महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना १६ जानेवारी रोजी देण्यात आले.दरम्यान, महामंडळाने या प्रश्नावर लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन  संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण आणि सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी केले आहे.