अभिनेता सलमान खान याच्या विरोधात सध्या चालविण्यात येत असलेल्या सदोष मनुष्यवध खटल्यातील स्वत:च्याच साक्षीदाराने दिलेल्या साक्षीबाबत सरकारी पक्षाने बुधवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सलमानच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत घेऊन जाणाऱ्या या पोलिसाने सत्र न्यायालयापुढे वेगळी साक्ष देण्यामागे काही तरी हेतू असल्याचा युक्तिवाद खुद्द सरकारी पक्षातर्फेच करण्यात आला. विशेष म्हणजे सलमानच्या वकिलांनी या सगळ्याला विरोध केला. सलमान विरोधातील या खटल्यात सध्या अंतिम युक्तिवाद केला जात आहे. बुधवारी झालेल्या युक्तिवादाच्या वेळेस सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलिसाच्या साक्षीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पोलिसाने महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर जी साक्ष दिली होती. त्यातील बऱ्याचशा बाबी त्याने सध्या सुरू असलेल्या खटल्यात साक्ष देताना नाकारल्या. त्यामुळे महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याची चुकीची साक्ष नोंदवून घेतली असे या साक्षीदाराला म्हणायचे आहे का, असा सवालही घरत यांनी युक्तिवाद करताना केला. तसेच अशी साक्ष देण्यामागे त्याचा काही तरी विशिष्ट हेतू असल्याचेही म्हटले. परंतु सरकारी वकिलांच्या या युक्तिवादाला सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी तीव्र विरोध केला.