मुंबईत एलफिस्टन रोड रेल्वे स्थानकांत झालेल्या चेंगराचेंगरी घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वे स्थानकांमधील पादचारी पुलांच्या दुरुस्तीसाठी माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर पुढे सरसावला आहे. यासाठी सचिनने आपल्या खासदार निधीतून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना त्याने पत्र लिहून याबाबत माहितीही दिली.

मुंबईत २९ सप्टेंबर रोजी झालेल्या तुफान पावसादरम्यान, एलफिस्टन रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सरकारने पादचारी पुलांच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार, आता सचिननेही पुढाकार घेतला आहे.
सचिनने रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘पश्चिम आणि मध्य रेल्वे लाईनवरील पादचारी पुलांच्या दुरुस्तीसाठी माझ्या खासदार निधीतून प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या निधीची पुर्तता करण्यात येईल. मुंबईकरांच्या सेवेत सुधारणा व्हावी यासाठी हा निधी देण्यात येत आहे.’

‘एलफिस्टन घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांसाठी ही दिवाळी आनंदाची नव्हती. देशात कोणत्याच भागात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी भारताचा जबाबदार नागरिक म्हणून आपण ही मदत करीत आहोत.’ असेही सचिनने या पत्रात म्हटले आहे.

खासदारांना प्रत्येक वर्षी ५ कोटींचा निधी आपल्या मतदारसंघातील लोकोपयोगी कामांसाठी दिला जातो.