‘पर्यटकांचे श्रद्धास्थान’अशी बिरुदावली मिरविणाऱ्या ‘सचिन ट्रॅव्हल्स’कडून मोठय़ा प्रमाणात फसवणूक झाल्याने अनेक पर्यटक हवालदील झाले आहेत. परदेश पर्यटन रद्द केल्यानंतर त्यासाठी नोंदणी केलेल्या सुमारे तीनशे जणांना दिलेले परताव्याचे धनादेशच न वटल्याने हे पर्यटक ‘सचिन’च्या कार्यालयांमध्ये खेटे घालत आहेत.
सचिन ट्रॅव्हल्सने ऑक्टोबर २०१२ मध्ये सिंगापूर, थायलंड, मलेशियाच्या आठ दिवसांच्या सहलीचे आयोजन केले होते. सुमारे ३०० हून अधिक लोकांनी प्रत्येकी ६० ते ७० हजार रुपये भरून त्यासाठी नावे नोंदविली आणि सहलीची तयारीही सुरू केली. मात्र अचानक सहल रद्द केल्याचा निरोप आला आणि लोकांना त्यांचे पैसे धनादेशाने परत देण्यासही सुरुवात झाली. मात्र त्यातील बहुतांश पर्यटकांचे धनादेश वटलेच नाहीत. अनेकांनी ही बाब सचिन ट्रॅव्हल्स व्यवस्थापनाच्या निदर्शनासही आणली. त्यानंतर अनेक वेळा पैसे परत देण्याचे वायदे करण्यात आले, मात्र ते पाळले गेले नाहीत. त्यामुळे हवालदील पर्यटकांनी थेट पोलिसांकडे जाण्याचा इशारा देताच गेल्या तीन दिवसांपासून काहींना रोख तर काहींना धनादेशाने पैसे परत दिले जात आहेत. तसेच व्याजासह रक्कम परत देण्याचा वायदा करूनही आता ‘व्याजाचे मार्चमध्ये बघू’ असे सांगून या पर्यटकांची बोळवण केली जात आहे.
याबाबत ‘सचिन ट्रॅव्हल्स’चे प्रमुख सचिन जकातदार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही घडल्या प्रकाराची कबुली दिली. काही अडचणींमुळे पर्यटकांचे पैसे परत देण्याचे राहिले. मात्र त्यांनी दिलेल्या तारखेपासून ९ टक्के व्याजाने हे पैसे देण्यात येत असून, आतापर्यंत २६३ लोकांचे पैसे रोख-चेकच्या माध्यमातून देण्यात आले आहेत, तसेच उर्वरित ८० लोकांचेही पैसे लवकरच दिले जातील, असे त्यांनी सांगितले. कंपनीची ३३ टक्के भागीदारी अन्य व्यक्तीला देण्यात आली असून, आपल्यावर सहलीच्या आयोजनाची तर त्यांच्यावर आर्थिक व्यवहारांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. पैशांचा परतावा त्यांच्याकडूनच केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.