२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुरेसे पुरावे नसल्याचा निर्वाळा राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्यानंतर या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्यासह दोन आरोपींनी सोमवारी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयानेही त्यांचे अर्ज दाखल करून घेत त्यावर ‘एनआयए’ला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

साध्वीसह सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण टक्कलकी अशा तिघांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. साध्वी हिच्याविरोधात पुरावे नसल्याचा ‘एनआयए’ने पुरवणी आरोपपत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याआधारे ती जामिनास पात्र असल्याचा दावा तिच्या जामीन अर्जात करण्यात आला आहे. शिवाय बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलचा वापर करण्यात आला, ती तिच्या नावे नोंद असली तरी ती फरारी आरोपी रामचंद्र कालसंगरा याच्या ताब्यात होती. त्यामुळे त्याच्या कृत्यांचे खापर तिच्या माथी मारता येऊ शकत नाही, असा दावाही अर्जात करण्यात आला आहे.

जबाब गहाळ करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी याप्रकरणातील महत्त्वाच्या सात साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती ‘एनआयए’ न्यायालयातून गहाळ होण्यासाठी जबाबदार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अंकुर पाटील, इमरान खान, अमजद खान आणि देवेंद्र कुमार मिश्रा यांनी केली.