प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेनंतर निर्मात्यांचा विचार; आक्षेप चुकीचा असल्याचे मंजुळे यांचे मत
‘फँ ड्री’नंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अर्चना पाटील आणि प्रशांत काळे या दोन तरुण जिवांची प्रेमकथा अधिक भव्यतेने मांडणारा हा चित्रपट तीन तासांचा आहे. अजय-अतुल यांचे संगीत, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या मुख्य जोडीच्या अभिनयाने प्रभावी ठरलेल्या या चित्रपटाची लांबी थोडी कमी असायला हवी होती, अशी प्रतिक्रिया काही प्रेक्षकांकडून आली आहे. त्यामुळे या चित्रपटाची लांबी कमी करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे मात्र नागराज मंजुळे अजून यासाठी तयार नाहीत.
‘फँड्री’ या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक म्हणून आपली मांडणी वेगळी आणि चाकोरीबाहेरची असल्याचे नागराज मंजुळे यांनी दाखवून दिले होते. ‘सैराट’मध्ये व्यावसायिक गणितांचे भान राखूनही नागराज मंजुळेंनी आपल्या खास शैलीतूनच चित्रपटाची मांडणी केली आहे. दोन जिवांची प्रेमकथा आणि वास्तवाचे भान आल्यानंतरची त्यांची परिस्थिती याचे चित्रण करणाऱ्या या चित्रपटाचा कालावधी २ तास ५० मिनिटे एवढा आहे. सध्या प्रेक्षकांचा कल हा कमी कालावधी असलेल्या चित्रपटांकडे जास्त आहे. त्यामुळे तीन तासांचा ‘सैराट’ पाहताना साहजिकच प्रेक्षकांवर त्याचा परिणाम होणार. या चित्रपटाची पटकथा ऐकल्यापासून ते त्याचे रफ चित्रिकरण पाहिल्यानंतरही हा चित्रपट थोडा मोठा झाला आहे. त्याची लांबी कमी असायला हवी असा आपला आग्रह होता. आता प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून त्यादृष्टीने आपण विचार सुरू केला असल्याचे चित्रपटाचे निर्माते ‘झी स्टुडिओ’चे नितीन केणी यांनी सांगितले. यासंदर्भात पुन्हा एडिटिंग झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक ठरणार आहे. हे शनिवार-रविवार या दोन दिवसांत शक्य नाही. त्यामुळे पुढच्या आठवडय़ात शक्य तितक्या लवकर चित्रपटाची लांबी थोडी कमी करून नव्या स्वरूपात दाखवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे के णी यांनी सांगितले.
मात्र चित्रपटाची लांबी योग्य असल्याचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे मत आहे. ‘सैराट’ची कथा दोन वेगळ्या भागात घडते. त्यातील पहिला मध्यंतरापूर्वीचा भाग खरे म्हणजे जास्त आहे. पण तो लोकांना आवडतो. त्यानंतर चित्रपट लांबला आहे अशी जी धारणा होते आहे ती चुकीची असल्याचे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. मध्यंतरानंतरच्या चित्रपटाचा कालावधी हा कमी असूनही तो प्रेक्षकांना मोठा वाटतो आहे. दिग्दर्शक म्हणून ‘सैराट’च्या मांडणीचा हा वेगळा प्रयोग आहे आणि लोकांनी तो स्वीकारायला हवा, त्यातले वास्तव पहायला हवे, असा नागराजचा आग्रह आहे. त्यामुळे अजून दोन दिवस प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून चित्रपटाची लांबी कमी करायची का, यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मंजुळे यांनी स्पष्ट केले.