बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा सोक्षमोक्ष केव्हा लागणार याची अंतिम तारिख मंगळवार २१ एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे.
सरकारी वकील आणि सलमान खानचे वकील या दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद संपल्यामुळे उद्या न्यायालय ‘हिट अँड रन’ प्रकरणाच्या निकालाची तारीख जाहीर करणार आहे. तब्बल १३ वर्षे न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याच्या अंतिम सुनावणीची तारिख निश्चित होणार असल्यामुळे उद्या न्यायालय सलमानच्या खटल्याला कोणती तारिख देणार आणि केव्हा या खटल्याला पूर्णविराम मिळणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून त्यातील एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस जबाबदार ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्याविरोधात सध्या सदोष मनुष्यवधाचा खटला चालविण्यात येत आहे.
सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवल्यास तो कोणत्या कलमांखाली दोषी आहे आणि त्याला किती शिक्षा होईल हे घोषित करण्यासाठी न्यायालय निकालाच्या दिवशी शिक्षेची तारीख घोषित करेल.
दरम्यान, या प्रकरणाचा साक्षीदार रविंद्र पाटील आता हयात नसल्याने त्यांची उलटतपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरू नये असा युक्तीवाद सलमानच्या वकिलांनी सोमवारी केला. याआधीही बचावपक्षाला अनेकवेळा रविंद्र पाटील यांच्या उलटतपासणीच्या संधी देण्यात आल्या होत्या, असे सरकारी वकिलांनी मत मांडले. रविंद्र पाटील हे सलमान खानच्या पोलीस सुरक्षारक्षकांपैकी एक होते. तसेच अपघातावेळी ते उपस्थित होते. २००२ साली रविंद्र यांनीच सलमानविरोधात तक्रार दाखल केली होती.