अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन खटल्यातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मन्सूर दरवेश यांनी माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या माहितीत ही बाब स्पष्ट झाली आहे. २१ जून २०१२ रोजी मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीमध्ये सलमानच्या खटल्याशी संबंधित असलेली कागदपत्रे नष्ट झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी मन्सूर दरवेश यांनी माहिती अधिकारातंर्गत शासनाच्या दोन विभागांकडून काही माहिती मागविली होती. यामध्ये त्यांनी सलमान खानविरुद्धचा खटला सुरू असताना या खटल्यातील एकूण वकिलांच्या संख्येबद्दल प्रशासनाकडे विचारणा केली होती. त्यानुसार या खटल्यात किती सरकारी आणि बचावपक्षाच्या वकीलांचा सहभाग होता आणि सरकारी वकिलांच्या मानधनापोटी किती खर्च झाला, याबद्दलची सविस्तर माहिती मिळणे मन्सूर यांना अपेक्षित होते. मात्र, उत्तरादाखल मन्सूर यांना याप्रकरणातील मोजकीच माहिती पुरविण्यात आली. बाकीची कागदपत्रे २०१२ साली लागलेल्या आगीत नष्ट झाल्यामुळे उर्वरित माहिती देता येणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले. मन्सूर यांना देण्यात आलेल्या माहितीमध्ये २०१४मध्ये सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांची नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख आहे. त्यांना प्रत्येक सुनावणीसाठी ६,००० रूपये मानधन मिळत असल्याचेही यामध्ये सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नष्ट झालेल्या सर्व कागदपत्रांची पुन्हा जुळवाजुळव करणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्याला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. या प्रकरणात सरकारचा किती खर्च झाला याची माहिती सरकारकडेच नाही ही बाब धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया मन्सूर दरवेश यांनी दिली.