अभिनेता सलमान खानचे काय होणार? तो निर्दोष सुटणार की तुरुंगात जाणार? याच एका प्रश्नाने बुधवारी सत्र न्यायालयातील कामकाज सुरू झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सकाळपासून न्यायालयाच्या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते आणि सकाळी सात वाजल्यापासूनच प्रसारमाध्यमांचे कॅमेरे सलमानला टिपण्यासाठी सत्र न्यायालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ सज्ज झाले होते.
सलमानच्या चाहत्यांसोबत त्याच्या विरोधकांनीही परिसरात गर्दी करायला सुरुवात केली होती. सलमानच्या अंगरक्षकांचे पथकही न्यायालयात बंदोबस्तासाठी दाखल झाले. एवढेच नव्हे, तर त्याच्या ‘बीइंग हय़ुमन’ संस्थेचे कार्यकर्तेही या वेळेस न्यायालयात हजर होते. तर दुसरीकडे सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील अतिरिक्त न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांचे अवघ्या तीस फुटांच्या न्यायालयात वकील, पत्रकार, पोलीस, सलमानचे नातेवाईक कोंबले गेले होते. एकीकडे या सगळ्याबाबत तक्रार केली जात असताना दुसरीकडे सलमान कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पावणेअकरानंतर अखेर सलमानचे कुटुंबीय सर्वप्रथम न्यायालयात दाखल झाले. सलमानचे भाऊ अरबाज खान, सोहेल खान, मेव्हणा अतुल अग्निहोत्री आणि मित्र बाबा सिद्दिकी हे न्यायालयातील मागील बाकावर बसून सलमानच्या येण्याची वाट पाहत होते. बरोबर ११ वाजून १० मिनिटांनी सलमान न्यायालयासमोर हजर झाला. त्याच्या चेहऱ्यावर निकालाचा ताण स्पष्ट जाणवत होता. त्यातच न्यायालयात गर्दी एवढी होती की सलमानला विरुद्ध दिशेला असलेल्या आरोपीच्या पिंजऱ्यात न्यायचे कसे, असा प्रश्न बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसमोर उपस्थित झाला आणि न्यायालयानेच सलमानला व्यासपीठासमोरून आरोपीच्या पिंजऱ्यात नेण्याचे आदेश दिले. त्यानंतर सव्वाअकरानंतर न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत असल्याचे जाहीर केले आणि सगळ्यांनी एकच गोंधळ केला. निकाल ऐकल्यानंतर सलमानच्या चेहऱ्यावरील नेमके हावभाव काय आहेत, शिक्षेबाबत न्यायालयाने केलेल्या विचारणेवर तो काय पुटपुटतो आहे हे पाहण्या आणि ऐकण्यासाठी सगळ्यांची चढाओढ सुरू झाली. दुसरीकडे निकाल ऐकल्यावर सलमानच्या विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या त्याच्या दोन्ही बहिणी अíपता आणि अलविरा यांना अश्रू अनावर झाले. सलमानही हतबलतेने त्या दोघींकडे पाहत होता. काही क्षणाकरिता त्याच्या डोळ्यांमध्येही पाणी तरळले. परंतु त्याने लगेचच सावरले. परंतु तो निकालाने हादरल्याचे त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्ट जाणवत होते.
निकाल जाहीर होताच ‘सलमानला दोषी’ ही ‘ब्रेकिंग न्यूज’ चालविण्यासाठी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना न्यायालयातून काढता पाय काढला. तर निकाल सुनावला जाईपर्यंत मागील बाकडय़ावर शांत बसलेले सलमानचे भाऊ अरबाज-सोहेलसुद्धा न्यायालयाने नक्की काय निकाल दिला याचा अंदाज घेऊ लागले. पत्रकारांकडूनच त्यांना सलमानला दोषी ठरवल्याचे कळले आणि सर्वाचे हात कपाळावर गेले. आता न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वाचे लक्ष होते. पण निकालानंतर सुरुवातीला हादरलेल्या सलमानच्या चेहऱ्यावर नंतर मात्र कोणतेही भाव नव्हते. अखेर युक्तिवाद संपल्यानंतर आणि न्यायालयाने निकाल १ वाजून १० मिनिटांनी जाहीर केल्याचे स्पष्ट केल्यानंतर अर्पिता आणि अलविरा यांनी सलमानच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत त्या सलमानच्या बाजूलाच उभ्या होत्या. सलमानचे उर्वरित कुटुंबही तेथे आले. सायंकाळी घरी जाईपर्यंत अर्पिता, अरबाज, अतुल अग्निहोत्री न्यायालयातच त्याच्यासोबत होते. उच्च न्यायालयाकडून हंगामी दिलासा मिळाल्यानंतर अखेर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सलमान कुटुंबीयांसोबत निवासस्थानी रवाना झाला.

वकील-प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींची बाचाबाची
सर्वसामान्यांना न्यायालय परिसरात मज्जाव करण्यात आला होता. मात्र सलमानला दोषी ठरवल्यानंतर वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी ‘ब्रेकिंग न्यूज’साठी न्यायालयातून पाय काढला. तर सलमान दोषी ठरल्याचे कळल्यावर वकीलवर्गाने देशपांडे यांच्या न्यायालयाकडे सलमानला पाहण्यासाठी धाव घेतली. परिणामी आधीच खचाखच भरलेल्या न्यायालयात जाण्यास बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी मज्जाव करण्यास सुरुवात केली. हेच निमित्त झाले आणि एकीकडे न्यायालयात सलमानच्या शिक्षेबाबत युक्तिवाद सुरू होता तर दुसरीकडे न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, वकीलवर्ग आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. ही धक्काबुक्की आणि बाचाबाची एवढी वाढली की न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले. न्यायाधीशांनीच आदेश दिल्यानंतर अखेर न्यायालयाचे दार बंद करण्यात आले. परंतु त्यानंतरही बाहेर जोरजोरात भांडण सुरूच होते.

प्रतिक्रिया
भयानक बातमी आहे. यावर काय बोलावे हे सुचत नाही. मात्र, काहीही झाले तरी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. तो एक चांगला माणूस आहे आणि त्याचा चांगूलपणा कोणीही त्याच्याकडून काढून घेऊ शकत नाही.
सोनाक्षी सिन्हा</strong>

सलमानमधील चांगुलपणा न्यायाधीशांच्याही लक्षात येईल, अशी आशा आहे.
– परिणिता चोप्रा

सलमानबद्दल कोणाला काय वाटते किंवा न्यायालय काय म्हणते याने काही फरक पडत नाही. सलमानला शिक्षा होणे योग्य नाही. काहीही झाले तरी मी कायम त्याच्या बाजूने आहे.
अर्जुन कपूर</strong>

आपला माणूस चुकीचा असला तरी त्याला शिक्षा झाल्यावर सर्वात जास्त दु:ख होते. आमचे तुझ्यावर प्रेम आहे आणि आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत.
आलिया भट्ट</strong>

सलमान खान हा इंडस्ट्रीतील एक चांगला माणूस आहे. त्याला झालेल्या शिक्षेमुळे अतीव दु:ख झाले असून त्याला या सगळ्या परिस्थितीत उभे राहण्याचे बळ मिळू दे.               – बिपाशा बसू

कपूर कु टुंबीय नेहमीच खान परिवाराच्या पाठीशी असेल.
काळ हेच या परिस्थितीवरचे औषध आहे.     – ऋषी कपूर

गायक अभिजीत यांचा माथेफिरूपणा
सलमानला झालेल्या शिक्षेबद्दल बोलण्यापेक्षा रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना कुत्र्याची उपमा देत त्यांचे पदपथावर झोपणे कसे चुकीचे आहे हे सांगण्याचा शहाजोगपणा ज्येष्ठ गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी केला आहे. ‘रस्त्यांवर कुत्र्यांसारखे झोपणारे कुत्र्यांसारखेच मरतात. मीही मुंबईत आल्यानंतर वर्षभर बेघर होतो. पण, म्हणून कधी फुटपाथवर झोपलो नाही’, असे माथेफिरू  विधान अभिजीत यांनी केले असून त्यांच्या या विधानाबद्दल सगळ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.