जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणात आपली उपस्थिती अनिवार्य असल्याचे कारण पुढे करत सध्या सुरू असलेल्या सदोष मनुष्यवधाच्या खटल्याची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्याची अभिनेता सलमान खान याची विनंती सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. दरम्यान, सलमानविरुद्धचे साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण झाल्याचे सरकारी पक्षाने सुनावणीच्या वेळेस जाहीर केले.
तत्पूर्वी, तीन आठवडे सुनावणी तहकूब करण्याची मागणी सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी सुनावणी सुरू होताच न्यायालयाकडे केली. मात्र जोधपूर येथील खटल्याच्या आधीच या खटल्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या खटल्याला प्राधान्य देण्यात यावे, असा युक्तिवाद करत विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सलमानच्या अर्जाला तीव्र विरोध केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानची विनंती फेटाळून लावत आरोपी म्हणून शुक्रवारी त्याच्या नोंदविण्यात येणाऱ्या जबाबासाठी त्याला हजर राहावेच लागेल, असे बजावले. अपघात घडल्यानंतर सर्वप्रथम प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्याची पुन्हा उलटतपासणीची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा सलमानच्या वकिलांनी केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला.
सलमानने ज्या ‘लॅण्ड क्रुझर’ गाडीने पदपथावर झोपलेल्यांना चिरडल्याचा आरोप आहे. त्याची अपघातानंतर काढण्यात आलेली छायाचित्रे न्यायालयात सादर करण्यात येऊन न्यायालयाने ती पुरावा म्हणून दाखल करून घेतली आहेत.