बॉलीवूड अभिनेता सलमान खानवरील ‘हिट अँड रन’ प्रकरणावर बुधवारी लागणाऱया निकालावर तब्बल २०० कोटींचा सट्टा लावण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या १३ वर्षांपासून सलमान खान विरोधात सुरू असलेला ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा खटला अंतिम टप्प्यात असून उद्या यावर निकाल येणे अपेक्षित आहे. या निकालावर अवघ्या बॉलीवूड सोबतच सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सट्टाबाजारात देखील सलमानच्या शिक्षेवर २०० कोटींचा सट्टा लागल्याची माहिती समोर आली आहे.
सलमान खटल्यातील न्यायाधीशाची बदली
बुधवारच्या निकालात काही भयंकर घडू नये अशी आशा चित्रपट उद्योग क्षेत्राला लागून राहिल्याचे व्यापार विश्लेषक कोमल नहाता यांनी सांगितले. अभिनेत्री करिना कपूरसोबतचा ‘बजरंगी भाईजान’ आणि सोनम कपूरसोबतचा ‘प्रेम रतन धन पायो’ या सलमानच्या दोन मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. नुकतेच सलमानने बजरंगी भाईजान चित्रपटासाठी काश्मीरमध्ये चित्रीकरण केले. चित्रपट व्यापार विश्लेषक अमोद मेहरा यांच्या माहितीनुसार, यापुढील काळात सलमान आणखी चार चित्रपटांसाठीच्या तयारीत असून यामध्ये ‘दबंग-३’, ‘एण्ट्री मैं नो एण्ट्री’ या चित्रपटांचा समावेश आहे.
दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सलमान खानवर चालविण्यात येणाऱ्या खटल्याचा निकाल बुधवारी ६ मे रोजी सकाळी ठीक ११ वाजून १५ मिनिटांनी सत्र न्यायालय देणार आहे.