हिट अॅंड रन प्रकरणात सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवित त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे त्याला बुधवारीच तुरुंगात जावे लागणार असल्याची शक्यता आहे. न्यायालयाने सलमानला दोषी ठरविल्यानंतर शिक्षेसंदर्भात बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर न्यायालायने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानला आर्थर रोड कारागृहात नेण्यात येणार आहे.
तीन वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्यावर दोषी व्यक्तीकडून त्याच न्यायालयात जामीनासाठी अर्ज करता येतो. मात्र, त्यापेक्षा मोठी शिक्षा सुनावण्यात आल्यावर दोषी व्यक्तीला वरिष्ठ न्यायालयात जामीनासाठी अर्ज करावा लागतो. सलमान खानच्या प्रकरणात त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे त्याला जामीनासाठी उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. मात्र, उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करणे आणि त्यावर सुनावणी होईपर्यंत सलमानला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात येईल. शिक्षा सुनावल्यानंतर पोलीसांनी न्यायालयातच सलमान खानला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे यांनी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. येत्या १० मे पासून उच्च न्यायालयाची उन्हाळी सुटी सुरू होत असल्यामुळे त्यापूर्वी सलमान खानला जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.