अहवाल सादर करण्यास सहा आठवडय़ांची मुदत

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलाने करण्यात आली की नाही या निष्कर्षांप्रति पोहोचणारा अहवाल मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी सीबीआयला सहा आठवडय़ांची मुदत दिली आहे. तर दुसरीकडे दाभोलकर हत्या प्रकरण तपासाची माहिती प्रसिद्धीमाध्यमांना देण्यावरून न्यायालयाने विशेष तपास पथकाला (एसआयटी) धारेवर धरले. तसेच हे थांबले नाही, तर त्यांच्याकडून तपास काढून घेण्याचा इशाराही दिला.

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या तिघांच्या शरीरातून सापडलेल्या गोळ्या एकाच पिस्तुलातील आहेत की नाही याच्या चाचणीसाठी त्या ‘स्कॉटलंड यार्ड’कडे पाठवण्यात येणार होत्या. मात्र तीन महिने उलटले तरी अद्याप त्या पाठवण्यात आलेल्या नाहीत. परंतु ‘स्कॉटलंड यार्ड’शी संपर्क साधण्यात आला असून लवकरच एका वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत या गोळ्या त्यांच्याकडे पाठवण्यात येतील, अशी माहिती सीबीआयच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. तसेच त्यासाठी सहा आठवडय़ांची मुदत मागण्यात आली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली. मात्र ही शेवटची संधी असल्याचेही सुनावले. ही चाचणी महत्त्वाची असून त्याच कारणास्तव तपास पुढे सरकत नसल्याचे कारण सीबीआय आणि एसआयटीकडून न्यायालयाला गेल्या तीन महिन्यांपासून देण्यात येत आहे.