मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागानंतर आता ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थेला’ही (आयडॉल) गोंधळाची बाधा होऊ लागली आहे. कारण आता आयडॉलने ‘द्वितीय वर्ष विज्ञान शाखे’च्या (माहिती-तंत्रज्ञान) या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नाची पुनरावृत्ती करून विद्यार्थ्यांना गोंधळात पाडले आहे.
एसवायबीएस्सीची ‘ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटल प्रोग्रॅमिंग’ ही परीक्षा बुधवारी (८मे) पार पडली. यात नव्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक ५ व ६ मधील ‘अ’ हा प्रश्न सारखाच होता. क्रमांक ५ आणि ६च्या दोन्ही प्रश्नांमध्ये चार प्रश्नांपैकी कोणतेही तीन सोडवायचे होते. पण, दोन्ही विभागात पाच गुणांसाठी विचारलेल्या या प्रश्नाची पुनरावृत्ती दुदैवाने कुणाच्याच लक्षात आली नाही.
विद्यार्थ्यांकडून तक्रार आली नाही, म्हणून आम्हीही ती दुरुस्त केली नाही, असे उत्तर संस्थेचे प्रमुख डी. हरिचंदन यांनी दिले. उलट प्रश्नाची पुनरावृत्ती झाली असेल तर विद्यार्थ्यांचा यात फायदाच आहे, असे उत्तर त्यांनी दिले. पण, ज्या विद्यार्थ्यांला हा प्रश्नच येत नव्हता त्याचे ते दुहेरी नुकसान नाही का, असा सवाल ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे कार्यकर्ते व विद्यापीठाचे अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला आहे. भवन्स आणि बांदोडकर महाविद्यालय या दोनच केंद्रांवर ही परीक्षा झाली. दोन्ही केंद्रांवर मिळून सुमारे १५० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.