गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, या मागणीसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी गुरुवारी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’वर भेट घेतली. केवळ अनधिकृत बांधकाम पाडून चालणार नाही. तर वायकर यांना मंत्रिपदावरून दूर केले पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
वायकर यांच्या संस्थेने २० एकर जमीन हडप केली असून ती काढून घ्यावी व व्यायामशाळेचे अनधिकृत बांधकाम पाडून टाकावे, अशी मागणी निरुपम यांनी यापूर्वी केली आहे. गोरेगावमध्ये आरे कॉलनीत वायकर यांनी आमदारपदी असताना व्यायामशाळा बांधण्यास शासनाची परवानगी घेतली होती. पण परवानगीपेक्षा त्यांनी वाढीव बांधकाम केले आहे. तसेच व्यायामशाळेच्या मागील सुमारे २० एकर जागा हडप केल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे.
निरुपम यांचे सारे आरोप वायकर यांनी फेटाळून लावले आहेत. २० एकर जागा हडप केल्याचा आरोप बिनबुडाचा असून, शासनाकडून अनुज्ञेय असलेल्या चार गुंठय़ाच्या जागेचा वापर करण्यात येत असल्याचा दावा वायकर यांनी केला. निरुपम यांनी राजकीय आकसाने आरोप केल्याचे वायकर यांचे म्हणणे आहे.