भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्रात अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी वृत्तवाहिनीशी बोलताना मांडले. शिवसेना, भाजपच्या नेतृत्त्वाखाली महायुतीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात आघाडी उघडली आहे. अशावेळी युतीतील एखाद्या पक्षाचा नेता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे कौतुक करीत असेल, तर लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल. त्याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होऊ शकतो, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, शरद पवार यांना विरोध केल्यामुळेच आज राजू शेट्टी आणि महादेव जानकर हे महायुतीमध्ये आले आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचे कौतुक करणे शिवसेनेला मान्य नाही. राज्यातील मराठी मते शिवसेनेसोबतच आहेत. शिवसेनेची मराठी मते कापण्याची हिंमत कोणामध्येही नाही. येत्या निवडणुकीत महायुती ४० जागा नक्कीच जिंकेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.