रवींद्र गायकवाड यांना विमान प्रवासावर बंदी घालून एअर इंडिया कंपनी माफियासारखे वागत आहे असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. जोपर्यंत पूर्ण प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत रवींद्र गायकवाड यांना दोषी ठरवणे अयोग्य आहे असे ते म्हणाले. रवींद्र गायकवाड यांनी चुकी केली आहे की नाही हे केवळ पूर्ण चौकशी अंतीच कळणार आहे तोपर्यंत त्यांच्यावर बंदी कोणत्या नियमांनुसार तुम्ही लादत आहात असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. रवींद्र गायकवाड यांच्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे एअर लाइनने म्हटले होते. त्यामुळे त्यांना विमानप्रवासावर बंदी घालण्यात आली. पुणे ते दिल्ली विमानप्रवासा दरम्यान एअर इंडियाचे कर्मचारी सुकुमार यांना त्यांनी मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चिघळले.

आपल्याजवळ बिजनेस क्लासचे तिकीट असताना एअर इंडियाने आपल्याला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवले असे रवींद्र गायकवाड यांनी म्हटले. त्यांनी आपल्याला तक्रार करायची आहे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोलायचे आहे असे म्हटले. त्यानंतर सुकुमार हे अधिकारी त्या ठिकाणी आले. सुकुमार आणि गायकवाड यांच्यामध्ये वाद झाला. पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला २५ वेळा सॅंडलने मारल्याची कबुली दिली होती. त्यानंतर इअर इंडियाने त्यांना विमान प्रवास करण्यावर बंदी घातली. त्यामुळे त्यांनी इंडिगोचे तिकीट काढले परंतु त्यांना इंडिगो तसेच इतर विमान कंपन्यांनी देखील त्यांना प्रवास करण्यावर बंदी घातली. त्यामुळे त्यांना रेल्वेनी प्रवास करावा लागला.

आपण खराब सेवेमुळे नाही तर नरेंद्र मोदींच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे आपण त्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्नही गायकवाड यांनी केला. एअर इंडियाने त्यांच्याविरुद्ध एफआयआरही दाखल केली आहे. सुकुमार आणि गायकवाड दोघांनिही आपण माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.  एअरलाइन्समधून कपिल शर्मा हा दारू पिऊन प्रवास करू शकतो, धिंगाणा घालू शकतो परंतु गायकवाड यांच्यासारखा लोकप्रतिनिधी प्रवास करू शकत नाही हा कुठला न्याय आहे असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.